प्रवरा स्कूलच्या मुला-मुलींची गोलांची आतषबाजी; आर्मी स्कूल, कर्नल परब स्कूलचीही दमदार कामगिरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मैदानावर वेगवान चाली, अचूक पासिंग, भक्कम बचाव आणि गोलसाठी अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली धडपड… अशा उत्साहपूर्ण वातावरणात फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांचा थरार शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अनुभवायला मिळाला. विविध वयोगटांतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. विशेषतः प्रवरा पब्लिक स्कूलच्या मुला-मुलींच्या संघांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या फरकाने विजय मिळविला. आर्मी स्कूल आणि कर्नल परब स्कूलच्या संघांनीही आपापल्या सामन्यांत प्रभावी खेळ करत स्पर्धेतील रंगत वाढवली.
सकाळच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलींच्या गटात आयकॉन पब्लिक स्कूल विरुद्ध श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात अटीतटीचा सामना झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सामना शेवटच्या टप्प्यात पोहोचला तरी दोन्ही संघांना यश मिळाले नाही. अखेर श्री साईची खेळाडू पूर्वा मालवे हिने 40 व्या मिनिटाला गोल करत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आयकॉन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले; मात्र श्री साईच्या बचावफळीने भक्कम खेळ करत आघाडी कायम राखली. श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने 1-0 गोलने विजय मिळविला.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने एकतर्फी वर्चस्व गाजविले. प्रवरा स्कूलच्या इंदिरा ब्राम्हणे हिने 30 व्या आणि 32 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रोशनी झिरवळ हिने 34 व्या मिनिटाला तर हेमा गावीत हिने 37 व्या मिनिटाला गोल करत प्रवरा स्कूलची आघाडी आणखी मजबूत केली. संपूर्ण सामन्यात प्रवरा स्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक व शिस्तबद्ध खेळ केला. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. प्रवरा पब्लिक स्कूलने 4-0 गोलने दणदणीत विजय मिळविला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटातही प्रवरा पब्लिक स्कूलने आपले वर्चस्व कायम ठेवत पोदार इंटरनॅशनल स्कूलवर 6-0 गोलने एकतर्फी विजय मिळविला. प्रवरा स्कूलच्या वैभव कविटकर याने 11 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर रणविजय जामकर याने 28 व्या मिनिटाला गोल केला. युवराज आहेर याने 27 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढविली. मोहित चौधरी याने 24 व्या, 35 व्या आणि 37 व्या मिनिटाला गोलची हॅट्ट्रिक नोंदवत प्रवरा स्कूलच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रवरा स्कूलच्या आक्रमक खेळापुढे पोदार स्कूलचा संघ पूर्णपणे निष्प्रभ ठरला.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात रंगतदार सामना झाला. प्रवरा स्कूलकडून आर्यन साबळे याने 6 व्या मिनिटाला गोल करत संघाला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मयुर वाळवी याने 27 व्या मिनिटाला गोल केला. पवन वाणी याने 48 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढविली. प्रविण काळे याने 53 व्या आणि 54 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत प्रवरा स्कूलचा विजय जवळपास निश्चित केला. पोदार स्कूलला यानंतर गोल करता न आल्याने प्रवरा पब्लिक स्कूलने 4-1 गोलने विजय मिळविला.
दुपारच्या सत्रात 14 वर्षांखालील मुलांच्या गटात ओएसिस स्कूल विरुद्ध ऊर्जा गुरुकुल यांच्यात सामना नियोजित होता. मात्र, ऊर्जा गुरुकुलचा संघ निर्धारित वेळेत मैदानावर उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे नियमानुसार ओएसिस स्कूलला विजय घोषित करून पुढील फेरीत पाठविण्यात आले.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात आठरे पाटील स्कूल विरुद्ध कर्नल परब स्कूल यांच्यात सामना झाला. कर्नल परब स्कूलच्या मुलींनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत सामन्यावर पकड निर्माण केली. कनिष्का खंडेलवाल हिने 15 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिया अडसुरे हिने 45 व्या मिनिटाला गोल करत कर्नल परब स्कूलचा विजय निश्चित केला. आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंना संपूर्ण सामन्यात एकही गोल करता आला नाही.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी स्कूल (एमआयसी अँड एस) विरुद्ध कर्नल परब स्कूल यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा ठरला. कर्नल परब स्कूलच्या प्रज्वल नवले याने 23 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, आर्मी स्कूलच्या राजवीर शेकडे याने 45 व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर दोन्ही संघांच्या बचावफळीने भक्कम खेळ केल्याने आणखी गोल होऊ शकला नाही. त्यामुळे सामना 1-1 गोलने बरोबरीत राहिला.
16 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी स्कूल (एमआयसी अँड एस) विरुद्ध कैसर एज्युकेशन फाऊंडेशन स्कूल यांच्यात सामना झाला. या सामन्यात आर्मी स्कूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 3-0 गोलने विजय मिळविला. आर्मी स्कूलकडून हरिश याने 15 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर संकेत गव्हाणे याने 28 व्या मिनिटाला गोल करत आघाडी वाढविली. शौर्य याने 48 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू न देता आर्मी स्कूलने भक्कम बचावाचे दर्शन घडविले.

