आर्मी पब्लिक स्कूलची दमदार कामगिरी; विविध वयोगटांतील रंगतदार लढतींनी रंगवला दिवस
गोलच्या हॅट्ट्रिकने वेधले लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. 7 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचे रंगतदार सामने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दिवसभर झालेल्या सामन्यांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने अनेक गटांत दमदार कामगिरी करत एकहाती वर्चस्व गाजवले, तर आर्मी पब्लिक स्कूलनेही प्रभावी खेळाच्या जोरावर महत्त्वपूर्ण विजय मिळवले. अनेक सामन्यांमध्ये खेळाडूंनी हॅट्ट्रिकची नोंद करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
सकाळच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 2-0 गोलने विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूलकडून सिद्धी पोटे हिने 33 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भावना हिने आणखी एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला.
यानंतर प्रवरा पब्लिक स्कूल आणि आठरे पाटील स्कूल यांच्यातील 16 वर्षांखालील मुलींचा सामना चुरशीचा झाला. प्रवरा पब्लिक स्कूलच्या दामिनी जाधव हिने 21 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर संघाने उत्कृष्ट बचावात्मक खेळ करत आठरे पाटील स्कूलला एकही गोल करण्याची संधी दिली नाही आणि प्रवरा पब्लिक स्कूलने 1-0 गोलने विजय मिळवला.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने ऊर्जा गुरुकुलवर 7-0 गोलने दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या 4 थ्या मिनिटाला धीरज चारस्कर आणि 5 व्या मिनिटाला युवराज आहेर यांनी सलग गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 8, 17 आणि 27 व्या मिनिटाला वैभव कविटकर याने सलग तीन गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. 10 व्या मिनिटाला रणविजय जामकर आणि 40 व्या मिनिटाला मयुर पिंपळे यांनीही गोलांची भर घालत प्रवराचा एकतर्फी विजय निश्चित केला.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि ओएसिस स्कूल यांच्यात रंगतदार सामना झाला. प्रवराकडून वरद चौहान याने 4 थ्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र 19 व्या मिनिटाला ओएसिस स्कूलच्या आर्यन पंडित याने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर प्रवराने पुन्हा आक्रमक खेळ करत 27 व्या मिनिटाला श्रेयश डोईफोडे आणि 42 व्या मिनिटाला कुनाल कानडे यांनी गोल करत संघाला 3-1 गोलने विजय मिळवून दिला.
दुपारच्या सत्रात 16 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने ओएसिस स्कूलवर 7-0 गोलने सहज विजय मिळवला. 4 थ्या मिनिटाला अभिनव राऊत याने गोल करत सुरुवात केली. त्यानंतर 11, 12 आणि 17 व्या मिनिटाला रामचंद्र पालवे याने सलग तीन गोल झळकावत हॅट्ट्रिक नोंदवली. 28 आणि 45 व्या मिनिटाला निखील वायभट याने दोन गोल केले, तर 35 व्या मिनिटाला प्रविण काळे याने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात ओएसिस स्कूलला एकही गोल करता आला नाही.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने ओएसिस स्कूलचा 4-0 गोलने पराभव केला. या सामन्यात युवराज आहेर याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत 3, 14, 19 आणि 29 व्या मिनिटाला तब्बल चार गोल झळकावले आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूलने कर्नल परब स्कूलवर 7-0 गोलने एकतर्फी विजय मिळवला. हेमा गावित हिने 5 व्या मिनिटाला गोल करत सुरुवात केली आणि त्यानंतर 15 व्या तसेच 40 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. 10 व्या मिनिटाला रोशनी झिरवळ, 30 व्या मिनिटाला कल्याणी भोसले, 31 व्या मिनिटाला दामिनी जाधव आणि 44 व्या मिनिटाला आरती बोरसे यांनी प्रत्येकी एक गोल करत प्रवराचा मोठा विजय निश्चित केला.
दिवसातील अखेरच्या सामन्यात 14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्मी पब्लिक स्कूलने कर्नल परब स्कूलचा 3-0 गोलने पराभव केला. आर्मी पब्लिक स्कूलकडून प्रथम गव्हाणे याने 17 व्या आणि 38 व्या मिनिटाला दोन गोल केले, तर 30 व्या मिनिटाला विजय सांगळे याने एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला.

