पाच सुवर्णपदके आणि ‘स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र 2026’सह ठरल्या विविध कितांबाचे मानकरी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पॉवरलिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत पाच सुवर्णपदके आणि पाच मानाच्या ट्रॉफी पटकावून अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देवनार कॉलनी, गोवंडी (मुंबई) येथे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा2026 मध्ये त्यांनी विविध गटांमध्ये वर्चस्व गाजवत ‘स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र’ या मानाच्या किताबांसह उल्लेखनीय यश संपादन केले.
ही स्पर्धा ॲम्युचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील नामांकित पॉवरलिफ्टर्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या स्पर्धेत अनुराधा मिश्रा यांनी आपल्या ताकद, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेत अनेक गटांत सुवर्णपदकांची कमाई केली.
स्पर्धेत त्यांनी मास्टर स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र 2026, मास्टर स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र (बेंच प्रेस) 2026, सिनिअर स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र (बेंच प्रेस) 2026, मास्टर स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र (डेडलिफ्ट) 2026 आणि सिनिअर स्ट्राँग वूमन ऑफ महाराष्ट्र (डेडलिफ्ट) 2026 हे मानाचे किताब पटकावत पाच सुवर्णपदके आणि पाच ट्रॉफींवर आपले नाव कोरले.
अनुराधा मिश्रा यांनी यापूर्वीही आशियाई पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, राज्यस्तरावरील या यशाने त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.
या उल्लेखनीय यशामागे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे आणि राष्ट्रीय पंच (नॅशनल रेफरी) निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनुराधा मिश्रा यांनी आपल्या तांत्रिक तयारीत सातत्याने सुधारणा करत उत्कृष्ट कामगिरी केली. अनुराधा मिश्रा या सध्या सावेडी येथील ‘जिम स्ट्राईकर’ येथे प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. त्यांच्या या यशामध्ये पती रत्नेश मिश्रा यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे मिश्रा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

