• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

ByMirror

May 15, 2025
अनाधिकृत डोनेशन घेणाऱ्या शाळांसमोर करणार सावित्रीबाई फुले जोडे पूजन

अनाधिकृत डोनेशन घेणाऱ्या शाळांसमोर करणार सावित्रीबाई फुले जोडे पूजन


शिक्षणाला परत एकदा पवित्रतेचा, समतेचा आणि हक्काचा दर्जा मिळावा -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकडून बेकायदेशीर पद्धतीने फी आकारून सुरु असलेल्या शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जोडे पूजन जारी करण्यात आला आहे. अनाधिकृत ॲडमीशन फी घेऊन मुलांना प्रवेश देणाऱ्या शाळांची नावे जाहीर करुन त्या शाळांसमोर सावित्रीबाई फुले जोडे पूजन करुन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अ नुसार, 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, अनेक खासगी व काही सरकारी शाळा या मुलांकडून बेकायदेशीर पद्धतीने फी आकारून या मूलभूत हक्काचा सरळसरळ भंग करत आहेत. हे शिक्षणाचं बाजारीकरण आहे, आणि याच अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीने एक निर्णायक जनआंदोलन उभारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.


शाळा शिक्षणासाठी फी आकारतात, अशा शाळांच्या गेटवर सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व त्यांचे जोडे पूजन करण्यात येईल. हे पूजन एका क्रांतीच्या स्मरणार्थ आणि जनतेचा आक्रोश यासाठी आहे. ही क्रांती आहे शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात, आणि गोरगरीब मुलांसाठी न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन राहणार असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
सर्व मुली या सावित्रीच्या लेकी आहेत आणि शिक्षण हे त्यांचं हक्काचं वारसाहक्क आहे. सावित्रीबाईंनी अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्रीशिक्षणासाठी लढा दिला. आज त्या लढ्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शिक्षणाचा हक्क कोणाच्याही खिशात विकत घेण्याची गोष्ट नाही! हा लढा केवळ फीविरोधात नाही, तर शिक्षणाला परत एकदा पवित्रतेचा, समतेचा आणि हक्काचा दर्जा मिळावा म्हणून संघटनेने पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.


बेकायदेशीररित्या घेतलेल्या सर्व फीची परतफेड केली जावी, अशा शाळांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर उत्तरदायित्व निश्‍चित करावं, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित शिक्षणव्यवस्था उभी करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *