• Sun. Oct 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरमध्ये जागतिक पांढरी काठी दिन उत्साहात साजरा

ByMirror

Oct 18, 2026
दिव्यांगांचा सन्मान, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा जागर

दिव्यांगांचा सन्मान, स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा जागर


दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पांढरी डिजीटल काठी, सॅक आणि स्मार्ट किटचे वितरण


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “प्रत्येक पावलात सन्मान, प्रत्येक संधीमध्ये समानता आणि प्रत्येक स्वप्नाला भरारी घेण्याची संधी!” या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवून अहिल्यानगर येथे जागतिक पांढरी काठी दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दृष्टिबाधित व्यक्तींच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे आणि समाजामध्ये समानता व समावेशकतेची भावना दृढ करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


दिव्य दृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था आणि शोभा सर्वोदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, तज्ज्ञ आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले. कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर समान संधी, योग्य मार्गदर्शन आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी आवश्‍यक पाठबळ देण्याचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी धनश्रीताई विखे पाटील, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ब्रिगेडियर राजीव चावला, वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे, उपअधीक्षक शिरीष वमने, बँक ऑफ बडोदाचे मनीष कुमार, हरजीतसिंग वधवा, दिव्य दृष्टी संस्थेचे कृष्णा तवले, PRM Soft Solutions Pvt. Ltd. चे मुख्य कार्यकारी अधिकारीसुमन कुरेल आदी उपस्थिती होते.
दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे धनश्रीताई विखे यांनी सांगितले. तर समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करून प्रत्येकजण समाजसेवा करू शकत असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन कडून 50 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात केले गेले. त्याचप्रमाणे शोभा सर्वोदय फाउंडेशन कडून एकूण 250 जणांना पांढरी डिजीटल काठीचे वाटप करण्यात आले. बँक ऑफ बडोदा कडून 100 जणांना सॅकचे वाटप करण्यात आले. डॉ.सुजय विखे फाउंडेशन आणि डीआरडीसी मार्फत स्मार्ट किटचे वितरण करण्यात आले. तसेच दिव्यांगासाठी इ सायकलचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमामध्ये दृष्टिबाधित व्यक्तींसाठी पांढऱ्या काठीचे वितरण, प्रेरणादायी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांच्या संधी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक समावेशन, बँकिंग सुविधा, गुन्हे प्रतिबंधक जागरूकता तसेच दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजना व विविध लाभांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


तिरुपती गायकवाड यांनी दिव्यांगांसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाविषयी माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक रवी रंजन प्रशून यांनी आर्थिक समावेशन व बँकिंग सुविधांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


जुन्नर येथील सेंटर फॉर डिसॅबिलिटी आर्ट्‌स डेव्हलपमेंटचे संस्थापक विकास बाजीराव घोगरे, अनामप्रेमच्या सौ. अनिता माने, दृष्टिबाधितांसाठी शिक्षक म्हणून कार्य करणारे सुनील परभणे आणि आकांक्षा रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संचालिका सविता काळे यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, पुनर्वसनासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला सलाम करण्यात आला.


जागतिक पांढरी काठी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, दृष्टिबाधित व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा, आत्मविश्‍वासाचा, सुरक्षिततेचा आणि समान हक्कांचा सन्मान करणारा दिवस आहे. पांढरी काठी ही केवळ चालण्याचे साधन नसून ती स्वावलंबन, आत्मविश्‍वास आणि स्वतंत्र जीवनाचा मार्ग दाखवणारे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार आणि सार्वजनिक जीवनात समान संधी उपलब्ध करून दिल्यास त्या समाजाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतात, हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
“दिव्यांगत्व ही मर्यादा नसून, योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती आपली क्षमता सिद्ध करू शकते,” हा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *