• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांमध्ये संतापाचा उद्रेक

ByMirror

Jul 15, 2024
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांमध्ये संतापाचा उद्रेक

बळजबरीने संडास आणि स्वच्छतागृहाची साफ-सफाई करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप

कामगारांची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)- अवतार मेहेरबाबा ट्रस्टमधील कामगारांना त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक व बळजबरीने संडास आणि स्वच्छतागृहाची साफ-सफाई करण्यास भाग पाडले जात असल्याच्या निषेधार्थ लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापुढे निदर्शने केली. कामगारांनी ट्रस्टच्या मनमानी कारभार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्या पदावर नेमणुक केली आहे, त्या संदर्भातील काम करुन संडास आणि स्वच्छतागृहाच्या साफ-सफाईला कामगारांनी विरोध दर्शविला.


या आंदोलनात लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, श्रीनाथ पाटोळे, संदीप कांबळे, गजानन शेळके, हरीश पाटोळे, तुषार शेलार, बाळासाहेब शिंदे, मालन डोळस, सुनिता डोळस, संगीता डोळस, मनीषा ससाणे, चंद्रकला देशमुख, छाया आजबे, सुमन पाटोळे, मंगल राजगुरू, संगीता पुंड, आशा आजबे, सुभाष शिंदे आदींसह कामगार सहभागी झाले होते.


ज्या कामासाठी नेमणुक करण्यात आली आहे, ते काम सोडून संडास आणि स्वच्छतागृहाची साफ-सफाई करण्यास भाग पाडले जात आहे. यामध्ये युनियनच्या हाउसकीपिंग व इतर वर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी त्या कामगारांची नेमणुम होणे आवश्‍यक आहे. मात्र युनियनच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करुन सदर काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.


सतीश पवार म्हणाले की, युनियन आणि ट्रस्टचा पगारवाढीचा करार होऊन, पाच ते सहा महिने उलटले आहे. ट्रस्टचे सुपरवायझर चूकीच्या पध्दतीने कामे देऊन कामगारांचे शोषण करत आहे. युनियन व इतर कामगारांमध्ये दुजाभाव करुन त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुरु असून, हा प्रकार न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. कॉ.ॲड. सुधीर टोकेकर यांनी ज्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली, तेच काम कामगार करणार आहेत. इतर कामे त्यांच्याकडे देऊन त्यांचे शोषण सुरु करण्यात आले आहे. हा प्रकार त्वरीत थांबविण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *