• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त अवयवदान-नेत्रदान जनजागृती

ByMirror

Nov 28, 2025
मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान काळाची गरज -जालिंदर बोरुडे

फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम; नागरिकांचे संकल्प अर्ज


मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान काळाची गरज -जालिंदर बोरुडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 व्या स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान व मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांकडून अवयवदान व नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरून घेण्यात आले.


या अभिवादन कार्यक्रमास फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतीश आहिरे, तसेच सूर्यकांत गिरवले, भिमाजी जाधव, गणेश जाधव, सुखदेव मुदळ, अनिल शेरकर, राजू झेंडे, रावसाहेब कर्पे, सुरेश इंगळे, बापूसाहेब भोसले, बाळासाहेब शिंदे, भगवान महानूर आदींसह विविध समाजघटकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजाचे देणे लागते, या भावनेने अवयवदान व नेत्रदान होण्याची गरज आहे. समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याने समाज सावरला गेला आहे. आज समाजाने देखील महापुरुषांच्या त्यागाची जाणीव ठेऊन मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान करणे काळाची गरज बनली आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान व नेत्रदानाची जनजागृती सुरु आहे. यामुळे अनेक अंध व्यक्तींना नवदृष्टी व इतरांना नवजीवन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सतीश आहिरे म्हणाले की, मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र व अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात व्यक्तींना जीवदान मिळते. जिवंतपणे रक्तदान, जाता जाता अवयवदान-नेत्रदान व मृत्यूनंतर देहदान करुन इतरांच्या उपयोगी पडावे. शरीराची माती मोल न होऊ न देता कोणाच्यातरी देह उपयोगी यावा. शरीर हे नश्‍वर असून, अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *