• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Oct 19, 2023

विविध आरोग्य शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

देवीचे दर्शन व आरोग्याचा प्रसाद आगळा-वेगळा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मंदिरात दर्शनास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम सुरु आहे. देवीचे दर्शन व आरोग्याचा प्रसाद हा आगळा-वेगळा उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात पार पडत आहे.


या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष रावसाहेब भोर, खजिनदार एकनाथ वाघ, सचिव दत्तात्रय विटेकर, विश्‍वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी उपस्थित होते.


प्रभाकर भोर म्हणाले की, खर्चिक आरोग्य सुविधांमुळे मोफत आरोग्य शिबिर मोठे आधार ठरत आहे. देवीच्या दर्शनाला सर्वसामान्य वर्गातील भाविक दर्शनाला येत असतात. त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात आले आहे. विविध गंभीर आजार टाळण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी तपासण्या आवश्‍यक आहे. आरोग्याप्रति जागरूक राहून मंदिराच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


मंदिरात ॲप्पल मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलद्वारे मोफत सर्व रोग निदान शिबिर, जर्मन मशीनद्वारे शारीरिक तपासणी, मोफत स्त्री रोग तपासणी व उपचार, नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सजीव गडगे, डॉ. अतिश केदारी, डॉ. अजय गवांदे, डॉ. छाया वडे, डॉ. प्रवीण बडे, देडगावकर, अजय गवांदे, भागवत गोरे, राजेंद्र बडे यांनी परिश्रम घेतले. तसेच ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि.21 ऑक्टोबर) रक्तदान शिबिर व रविवारी (दि.22 ऑक्टोबर) सर्व रोग निदान शिबिर व उपचाराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *