• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

कवयित्री सरोज आल्हाट यांना राष्ट्रीय सावित्रीबाई फुले फेलोशिप जाहीर

ByMirror

Nov 14, 2024

दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- येथील प्रसिद्ध कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारी राष्ट्रीय सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप जाहीर झाली आहे. भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांनी आल्हाट यांना फेलोशिप जाहीर झाल्याचे कळविले आहे.


8 डिसेंबर रोजी दिल्ली येथील पंचशील आश्रम, रिंग रोड येथे होणाऱ्या 40 व्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात ही फेलोशिप मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कवयित्री सरोज आल्हाट या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री असून मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने यापूर्वी गौरविण्यात आले आहे.


सरोज आल्हाट या गेल्या 25 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच काव्य लेखन करीत असून, त्यांचे अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे, कविता तुझ्या नि माझ्या, अनन्यता असे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक इंग्रजी व मराठी मासिकांचे त्यांनी संपादन केले असून, मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्येही त्यांच्या लेख व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील अनेक साहित्य संमेलने, कवी संमेलने, परिसंवाद, महिलांच्या कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.


प्रकल्प संचालक, जनरल सेक्रेटरी अशा उच्च पदावर राहून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बालकल्याण, परित्यक्ता, आरोग्य समस्या, युवकांचे प्रश्‍न, कुष्ठरुग्ण, वीट भट्टी व ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त आदींसाठी विकासात्मक व धोरणात्मक कार्यक्रमांमध्ये त्या गेली तीस वर्षापासून काम करीत आहेत. या कार्याची दखल घेऊन आल्हाट यांना राष्ट्रीय सावित्रीबाई फुले फेलोशिप जाहीर झाली असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *