• Tue. Apr 28th, 2026

महापालिकेचे आरोग्य केंद्र झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आधार -विकास उडाणशिवे

ByMirror

Apr 27, 2026

रामवाडी येथील आरोग्य केंद्रात समता फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी


शबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी आणि जुनी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या रामवाडी परिसरात आरोग्य सुविधांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. येथे प्रमुख्याने कचरा वेचक, कष्टकरी कामगार व रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, या नागरिकांसाठी आरोग्य सेवा पूर्वी मोठे आव्हान होते. मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या अहिल्यानगर शाखेचे निमंत्रक विकास उडाणशिवे यांनी केले.


महानगरपालिकेच्या वतीने रामवाडी येथे उभारण्यात आलेले आरोग्य केंद्रात समता फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे बोलताना उडाणशिवे म्हणाले की, महानगरपालिकेच्या वतीने रामवाडी येथे उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र आज अनेक गरजूंसाठी जीवनदान देण्याचे कार्य करत आहे. या केंद्रामध्ये सामान्य तपासणी, औषधोपचार, लसीकरण तसेच विविध आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने परिसरातील नागरिकांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


या शिबिरामध्ये डॉ. अभिषेक शिंदे व डॉ. आनंद बोजा यांनी 40 कचरा वेचक कामगारांची नेत्र तपासणी केली. त्यापैकी 15 कचरा वेचक कामगारांची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. या उपक्रमासाठी रामवाडी आरोग्य केंद्राच्या स्टाफ नर्स रोहिणी बोरुडे तसेच सहसेविका नीता उडानशिवे आणि देविदास पोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या विशेष सहकार्यामुळे रामवाडी येथे हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले. आज कचरा वेचक तसेच अन्य कामगारांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे आयुक्त डांगे यांच्या संवेदनशील निर्णयामुळेच शक्य झाले. शहराच्या इतर भागातील आरोग्य केंद्रात 10 रुपये घेतले जातात, परंतु रामवाडी केंद्रावर विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने आयुक्तांचे आभार मानण्यात आले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, समाजातील कष्टकरी व वंचित घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *