केडगाव येथील वासन टोयोटा शोरूमला महापौरांची भेट; महिला कर्मचाऱ्यांशी संवाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील वासन टोयोटा शोरूमला महापौर ज्योतीताई गाडे यांनी नुकतीच भेट देऊन महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कामाच्या ठिकाणी महिलांना मिळणारे प्रोत्साहन, समान संधी तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
महिलांनी आत्मविश्वासाने विविध क्षेत्रांमध्ये काम करावे, त्यांना सुरक्षित व सकारात्मक कार्य वातावरण मिळावे आणि त्यांच्या क्षमतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याबाबत महापौर ज्योतीताई गाडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वासन टोयोटा शोरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे त्यांनी कौतुक केले. महापौर ज्योतीताई गाडे यांचे स्वागत श्रीमती सुनीता जनक आहुजा यांनी केले. यावेळी सुनीता बक्षी, रजनी चोप्रा, सुमन कपूर, अलका पोटे उपस्थित होत्या. तसेच शोरूमच्या वतीने जनक आहुजा, तेजजी बेदी, अजय गुप्ता, अनिश आहुजा आणि सौरभ क्षोत्री उपस्थित होते.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, आज महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, राजकारण, क्रीडा, तंत्रज्ञान यांसह सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. महिलांमध्ये क्षमता आणि आत्मविश्वासाची कमतरता नाही; त्यांना योग्य संधी, सुरक्षित वातावरण आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. वासन टोयोटा शोरूममध्ये महिलांना विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे दिसून येते. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे ही संस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होतो. त्यामुळे महिलांना केवळ नोकरीच्या संधी न देता नेतृत्वाच्या आणि निर्णय प्रक्रियेतील संधीही मिळणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण हा केवळ महिलांचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीशी संबंधित विषय असल्याचेही महापौर गाडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जनक आहुजा म्हणाले की, वासन टोयोटाच्या कामकाजात महिला कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. महिलांमध्ये असलेल्या कौशल्याचा आणि कार्यक्षमतेचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी त्यांना विश्वासाने जबाबदाऱ्या दिले जाते. महिला आणि पुरुष हे संस्थेच्या प्रगतीचे समान भागीदार आहेत. महिलांना संधी दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यास संस्थेचे प्राधान्य असल्याचे जनक आहुजा यांनी सांगितले.

