• Tue. Sep 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

आजी-माजी सैनिकांच्या आरोग्यासाठी साई माऊली हॉस्पिटलमध्ये ईसीएचएस सेवा सुरू

ByMirror

Sep 29, 2026
कॅन्सरपासून हाडे, हृदय, मधुमेह, मूत्रपिंड व मेंदू-मणक्यांपर्यंत तज्ज्ञ उपचारांची सुविधा

शहीद परिवारांनाही मिळणार तज्ज्ञ वैद्यकीय उपचार; जय हिंद फाउंडेशन व त्रिदल सैनिक संघटनेतर्फे गिते कुटुंबीयांचा सन्मान


कॅन्सरपासून हाडे, हृदय, मधुमेह, मूत्रपिंड व मेंदू-मणक्यांपर्यंत तज्ज्ञ उपचारांची सुविधा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शहराच्या भिस्तबाग येथील साई माऊली हॉस्पिटलमध्ये ईसीएचएस (ECHS) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध आजारांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांचा लाभ घेता येणार आहे.


साई माऊली हॉस्पिटलमध्ये ईसीएचएस सेवा सुरू झाल्याबद्दल जय हिंद फाउंडेशन व त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. संतोष गिते (एम.डी. मेडिसिन), डॉ. वर्षा गिते (भुलतज्ज्ञ), डॉ. गणेश गिते (एम.एस. ऑर्थो), डॉ. विजयश्री गिते (आय स्पेशालिस्ट), डॉ. तुकाराम गिते (डेंटिस्ट) आणि डॉ. दीपली गिते (बी.ए.एम.एस.) यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना डॉ. संतोष गिते म्हणाले की, सैनिक देशाच्या सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत देशाच्या सुरक्षेसाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक बांधिलकी आहे. सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी साई माऊली हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


साई माऊली हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कॅन्सरतज्ज्ञ, हाडांचे तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ, मूत्रपिंडतज्ज्ञ, मेंदू व मणक्यांचे तज्ज्ञ तसेच फुफ्फुसतज्ज्ञ यांसह विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधांसह विविध रोगांचे निदान व उपचार सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.


त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने गोवर्धन गर्जे यांनी साई माऊली हॉस्पिटल प्रशासनाकडून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची घेतली जाणारी काळजी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ईसीएचएस सेवेमुळे आजी-माजी सैनिकांना तसेच शहीद परिवारांना मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे म्हणाले की, आजी-माजी सैनिक आणि शहीद परिवारांच्या आरोग्यसेवेला साई माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे. सैनिकांना उत्तम, वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्रिदलचे गोवर्धन गर्जे, संजय म्हस्के, सोमीनाथ गोल्हार, सिताराम गर्जे, रामचंद्र वायभासे, महादेव लांडणे, दिनकर बडे, लक्ष्मण ढाकणे, जालिंदर गोल्हार, राजेंद्र जायभाय, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, धर्मा पालवे, शिवाजी गर्जे, संजय पाटेकर, संतोष शिंदे, गोरक्ष पालवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार त्रिदल सैनिक संघटनेचे मेजर संजय म्हस्के यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *