पुनर्मूल्यांकनानंतर मिळाले शंभर टक्के गुण; संस्थेच्या वतीने सन्मान
दहावीच्या 2025-26 बॅचमध्ये जिल्ह्यात 100% गुण मिळवणारी ठरली एकमेव विद्यार्थिनी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची विद्यार्थिनी गुंजन महेश गोले हिने दहावीच्या परीक्षेत अखेर शंभर टक्के गुण प्राप्त करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रारंभी 99.40 टक्के गुण मिळाल्यानंतर फोटो कॉपी तपासणी व पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ होत अखेर तिला 100 टक्के गुण मिळाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. या यशामुळे ती अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर टक्के गुण मिळवणारी एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
गुंजनच्या या अभूतपूर्व यशाबद्दल अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे खजिनदार प्रकाश गांधी, मुख्याध्यापक कैलास साबळे, महेश वसंत गोले, अंजली गोले, प्रमोद गांधी आदी उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुंजनला 99.40 टक्के गुण मिळाले होते. गुणवाढीची शक्यता लक्षात घेऊन उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागविण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या तपासणीत तिचे गुण वाढून 99.80 टयांवर पोहोचले. मात्र, यानंतरही तिच्या पालकांनी संबंधित विषयांच्या गुणांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेनंतर तिच्या गुणांमध्ये आणखी वाढ होऊन तिला 100 टक्के गुण मिळाल्याचे नुकतेच कळविण्यात आले.
पुणे विभागातून यंदा सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या सर्व विद्यार्थ्यांमधून केवळ बारा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळविण्याचा मान मिळाला आहे. त्यामध्ये गुंजन गोलेचा समावेश असून, तिच्या या यशामुळे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा शैक्षणिक सन्मान उंचावला आहे.
गुंजनच्या यशामागे तिची जिद्द, कष्ट, कुटुंबाचे आणि शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करुन छायाताई फिरोदिया यांनी तिचे विशेष कौतुक केले. तिचे वडील महेश गोले हे व्हीआरडीईमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई अंजली गोले या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. घरातील शैक्षणिक वातावरण, नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तिने हे यश संपादन केले.
गुंजनच्या या यशाबद्दल संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, विश्वस्त ॲड. गौरव मिरीकर यांच्यासह विश्वस्त मंडळातील सदस्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

