• Mon. Oct 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

एमआयडीसीच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या मंदिरासमोरील दुभाजकावर 150 झाडांची लागवड

ByMirror

Oct 12, 2026
नवरात्रोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर

नवरात्रोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर


नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पुढाकार घ्यावा -आ. संग्राम जगताप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरासमोरील रस्त्याच्या दुभाजकावर तब्बल 150 झाडांची लागवड करण्यात आली असून, या उपक्रमामुळे मंदिर परिसर हिरवाईने बहरला आहे. केवळ वृक्षारोपण करून न थांबता या झाडांच्या संगोपनाची आणि संवर्धनाची जबाबदारीही देवस्थान ट्रस्टने स्वीकारली आहे.


एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यावरही देवस्थान ट्रस्टचा भर असतो. यंदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिरासमोरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर माती टाकून वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.


शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावल्यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर झाडांच्या योग्य संगोपनातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासही हातभार लागतो. या उद्देशाने देवस्थान ट्रस्टने मंदिरासमोरील दुभाजकावर 150 झाडांची लागवड केली. मंदिर परिसरात निर्माण झालेली हिरवाई भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. वृक्षारोपणासोबतच झाडांना नियमित पाणी देणे आणि त्यांचे संगोपन करणे यासाठीही ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.


या सामाजिक उपक्रमाला आमदार संग्राम जगताप यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः झाडांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाच्या कार्यात सहभाग नोंदविला. देवस्थान ट्रस्टने धार्मिक कार्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट धार्मिक सोहळ्यांसोबतच विविध सामाजिक उपक्रमही राबवत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला वृक्षारोपणाचा उपक्रम प्रेरणादायी आहे. दहा-वीस नव्हे, तर तब्बल 150 झाडांची लागवड करून ट्रस्टने संपूर्ण मंदिर परिसराला सुंदर भेट दिली आहे.


ते पुढे म्हणाले की, आज पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, वाढते तापमान, पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाला विशेष महत्त्व आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर ती जगविणे आणि त्यांची नियमित काळजी घेणेही तितकेच आवश्‍यक आहे. निसर्गचक्र पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात पुढाकार घ्यावा. श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टने सुरू केलेला हा उपक्रम इतर संस्था आणि सामाजिक संघटनांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नवनाथ कातोरे, संपत बारस्कर यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *