• Sat. May 9th, 2026

“ॲलेक्स कपमध्ये फिरोदिया युनायटेड व गुलमोहरची अंतिम फेरीत धडक”

ByMirror

May 9, 2026

“उपांत्य फेरीत रंगला फुटबॉलचा थरार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कपच्या 8 व्या पर्वातील फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीचे सामने अत्यंत रंगतदार व चुरशीचे झाले. शुक्रवारी (दि. 8 मे) झालेल्या उपांत्य फेरीतील लढतींमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. आता या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.


उपांत्य फेरीतील पहिला सामना फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक आणि बचावात्मक खेळाचा उत्कृष्ट संगम दाखवत एकमेकांना जोरदार झुंज दिली. मैदानावर चेंडूसाठी चुरस, जलद पासिंग आणि गोल करण्यासाठी दोन्ही संघांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे सामना अत्यंत रोमांचक झाला.


संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला. टायब्रेकरमध्ये फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड संघाने संयम राखत अचूक खेळ केला आणि 4-2 अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केला. फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड संघाकडून उत्कर्ष सोनवणे, भानुदास चंद, नील धेंडवाल आणि अनोश कामाठी यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी संघाकडून निकोलस आणि रोनाल्ड यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
दुसरा उपांत्य फेरीतील सामना फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब यांच्यात रंगला. सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबच्या खेळाडूंनी सुरेख समन्वय आणि शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर सामन्यावर पकड ठेवली.


सामन्याच्या 15 व्या मिनिटाला परेश म्याना याने शानदार गोल करत गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबने बरोबरीसाठी अनेक आक्रमणे केली, मात्र गुलमोहरच्या बचावफळीने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करू दिला नाही. अखेरीस 1-0 अशा फरकाने विजय मिळवत गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि गुलमोहर स्पोर्ट्‌स क्लब हे दोन दमदार संघ आमनेसामने येणार असल्याने विजेतेपदासाठी रंगणाऱ्या या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *