भुईकोट किल्ला मैदानावर फुटबॉलचा थरार; रंगतदार सामन्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर सुरू असलेल्या ॲलेक्स कपच्या 8 व्या पर्वातील फुटबॉल स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, दररोज रंगणाऱ्या चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेचा थरार अधिकच वाढत आहे. बुधवारी (दि.6 मे) झालेल्या दोन महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड या संघांनी शानदार विजय मिळवत पुढील फेरीकडे दमदार वाटचाल केली.
स्पर्धेतील गुलमोहर स्पोर्टस क्लब विरुद्ध बाटा फुटबॉल क्लब यांच्यातील सामना विशेष लक्षवेधी ठरला. सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केले. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला बाटा फुटबॉल क्लबच्या कामरान रंगरेज याने शानदार गोल करत संघाचे खाते उघडले आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर बाटा एफ.सी.चा आत्मविश्वास उंचावला होता.

मात्र पिछाडीवर पडल्यानंतर गुलमोहर स्पोर्टस क्लब ने अधिक आक्रमक आणि संयमी खेळ करत पुनरागमन केले. संघाच्या प्रणव पंडित याने 17 व्या मिनिटाला अचूक गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सामन्याच्या 27 व्या मिनिटाला आदित्य गुगळे याने अप्रतिम गोल करत गुलमोहर एस.सी.ला 2-1 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखण्यात संघाला यश आले आणि गुलमोहर स्पोर्टस क्लब ने शानदार विजयाची नोंद केली.
दुसऱ्या सामन्यात फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड आणि फ्रेंडस मातोश्री फुटबॉल क्लब यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत गोल करण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या. सामन्याच्या 26 व्या मिनिटाला भानुदास चंद याने अचूक गोल करत फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. त्यानंतर फ्रेंडस मातोश्री एफ.सी. संघाने बरोबरी साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेडच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार अवस्थेत राहिला आणि प्रेक्षकांनी प्रत्येक क्षणाचा उत्साहाने आनंद घेतला. स्पर्धेतील वेगवान खेळ, उत्कृष्ट पासिंग, बचावातील शिस्त आणि आक्रमणातील धार यामुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. ॲलेक्स कप स्पर्धेमुळे शहरातील फुटबॉल संस्कृतीला चालना मिळत असून युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
