• Fri. May 8th, 2026

दिल्लीगेट येथे 17 मे रोजी उभारली जाणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-शिक्षणाची क्रांतिकारी “ज्ञानगुढी”

ByMirror

May 7, 2026

मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निरीक्षणाला दिली जाणार राष्ट्रीय सलामी; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नावाखाली होणारे कर्णकर्कश डीजे, ध्वनीप्रदूषण आणि दिखाऊ शक्तिप्रदर्शन यावर कठोर प्रश्न उपस्थित करत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निरीक्षण नोंदवले आहे. या निरीक्षणाचे पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, त्याला “राष्ट्रीय सलामी” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या पार्श्वभूमीवर शहरातील दिल्लीगेट परिसरात रविवार, दि. 17 मे रोजी सकाळी 10.30 वाजता “ज्ञानगुढी” उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. ही ज्ञानगुढी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित बौद्धिक आणि वैचारिक चळवळीचे प्रतीक असणार आहे.


न्यायालयाच्या खंडपीठातील मा. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके आणि मा. न्यायमूर्ती निवेदिता पी. मेहता यांनी आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धिक विकास आणि वंचितांचे उत्थान अधिक प्रिय असते.” हे निरीक्षण केवळ न्यायालयीन टिप्पणी नसून आधुनिक भारताच्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब असल्याचे मत ॲड. गवळी यांनी व्यक्त केले.


ॲड. गवळी पुढे म्हणाले की, उभारण्यात येणारी “ज्ञानगुढी” ही डीजे संस्कृती, ध्वनीप्रदूषण, दिखाऊ राजकारण, मानसिक गुलामगिरी, अज्ञान आणि अंधानुकरणाविरोधातील वैचारिक प्रतिकाराचे प्रतीक असेल. ही गुढी विवेक, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि बौद्धिक क्रांती यांचे प्रतीक म्हणून उभारली जाणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षणाची क्रांती, स्वाभिमान आणि विचारस्वातंत्र्य दिले. त्यांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मूलमंत्र दिला. त्यांनी कधीही गोंधळ, ध्वनीप्रदूषण किंवा दिखाऊ शक्तिप्रदर्शनाचा पुरस्कार केला नाही, असे अधोरेखित करत ॲड. गवळी म्हणाले की, आज अनेक ठिकाणी जयंती उत्सव हे डीजे, फटाके, रस्ते बंद, वाहतूक कोंडी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीपुरते मर्यादित होत चालले आहेत.


संघटनेच्या वतीने असेही स्पष्ट करण्यात आले की, न्यायालयाने उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे — “जर एखादा विद्यार्थी अभ्यास करू शकत नसेल, रुग्ण झोपू शकत नसेल, वृद्ध त्रस्त होत असतील, तर हा कोणता सामाजिक न्याय?”
“ज्ञानगुढी” म्हणजे वाचनालये आणि अभ्यासिकांची प्रेरणा, संविधान वाचनाचा संदेश, विज्ञाननिष्ठ चर्चा, गरीब विद्यार्थ्यांना मदत आणि जातीय मानसिकतेविरुद्ध वैचारिक लढा, असे या उपक्रमाचे स्वरूप असणार आहे.
“मोठा आवाज म्हणजे मोठा विचार नसतो; डीजे काही तास घुमतो, पण ज्ञान पिढ्यान्पिढ्या घुमत राहते,” असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.


शहरातील सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक “ज्ञानगुढी” उभारणी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा उपक्रम वैचारिक परिवर्तनाकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक प्रयत्न असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.


या अभियानासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *