• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

कामगारांना हक्क केवळ संघर्षाच्या आणि एकजुटीच्या जोरावरच मिळाले -कॉ. सतीश पवार

ByMirror

May 3, 2026
अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कर्मचारी युनियनचा एकजुटीचा निर्धार

अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कर्मचारी युनियनचा एकजुटीचा निर्धार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “कामगारांनी आजवर जे काही मिळवले आहे, ते केवळ संघर्षाच्या आणि एकजुटीच्या जोरावरच मिळाले आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली संघटना अधिक मजबूत करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार यांनी केले.


अरणगाव येथे लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न ‘अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कर्मचारी युनियन’ ची कामगार दिनानिमित्त बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात पवार बोलत होते. प्रारंभी कामगार युनियनच्या फलकाचे पूजन करण्यात आले. उपस्थित कामगारांनी “कामगार एकजुटीचा विजय असो” आणि “लाल बावटा झिंदाबाद” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


पुढे पवार म्हणाले की, 1886 च्या शिकागो आंदोलनापासून सुरू झालेला कामगारांचा लढा आजही संपलेला नाही. 8 तास काम आणि कामाचा मोबदला हा आमचा घटनात्मक हक्क आहे. हक्कांसाठी लढा: मेहेरबाबा ट्रस्टमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी युनियन सदैव कटिबद्ध राहील, असे त्यांनी सांगितले. तर कोणत्याही दबावाला बळी न पडता कामगारांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

या सभेला युनियनचे मार्गदर्शक ॲड. कॉ. सुभाष लांडे (जिल्हा सचिव) आणि ॲड. कॉ. सुधीर टोकेकर (जिल्हा कार्याध्यक्ष) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सभेच्या नियोजनात संजय कांबळे, सुनील दळवी, बबन भिंगारदिवे यांनी विशेष पुढाकार घेतला. याप्रसंगी गणेश गहिले, सुभाष शिंदे, प्रविण भिंगारदिवे, राजू मोरे, श्रीनिवास वंगार व इतर कर्मचारी हजर होते. सर्व उपस्थित कामगारांनी आपले हात उंचावून, कामगार हितासाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी सदैव संघटित राहण्याची शपथ घेतली. आगामी काळात कामगार प्रश्‍नांवर अधिक तीव्रतेने लढा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *