• Fri. May 8th, 2026

शहरात ‘इन्फोसिस’ स्प्रिंगबोर्ड च्या मोबाईल सायन्स लॅबचे उद्घाटन

ByMirror

May 7, 2026

घरोघरी विद्यार्थ्यांना मिळणार एआय, कोडिंग आणि विज्ञान प्रयोगांचे आधुनिक शिक्षण


शिक्षण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणणारा हा उपक्रम -दत्ता गाडळकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा देणारा ‘इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड बंगळूर’ व अत्याधुनिक ‘मोबाईल सायन्स लॅब’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा कल्याण रोड येथील सांस्कृतिक भवन येथे शुभारंभ करण्यात आला. मिशन आपुलकी आणि जागतिक कीर्तीची आयटी कंपनी इन्फोसिस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरसेवक दत्ता गाडळकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम शहरात राबविण्यात आला. हा शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे दालन खुलं करणारा ठरत आहे.


सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे विज्ञान शिक्षण, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होणार असून त्यांच्या करिअरच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या हस्ते झाले.


मिशन आपुलकीचे नोडल अधिकारी तथा सहायक संचालक (लोकल फंड) रमेश कासार म्हणाले की, “इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड हा डिजिटल प्लॅटफॉर्म शहरी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोडिंग, सायबर सिक्युरिटी, एआय आणि विविध कौशल्य विकासाचे पाच हजारांहून अधिक कोर्सेस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संपूर्ण भारतात इन्फोसिसचे 6 अत्याधुनिक ‘मोबाईल सायन्स लॅब’ असून, त्यातील एक लॅब आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे. कल्याण रोडवरून सुरू झालेली ही मोबाईल सायन्स लॅब म्हणजे विज्ञानाचे चालते-फिरते विद्यापीठच असल्याचे त्यांनी सांगितले.


खासेराव शितोळे म्हणाले की, “पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थी अधिक प्रभावीपणे शिकतात. ही मोबाईल लॅब प्रत्येक केंद्रशाळेवर जाऊन विज्ञानाचे 300 हून अधिक प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखवेल. विज्ञान विषयातील कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जाणार आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


प्रा. भगवान काटे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, मात्र त्यांना आधुनिक साधनांची कमतरता भासत असते. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारामुळे आणि इन्फोसिसच्या सहकार्यामुळे आता ग्रामीण भागातील गरिबातील गरीब विद्यार्थ्यालाही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण मोफत मिळणार आहे. हा उपक्रम नगर जिल्ह्यासाठी भूषणावह ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नगरसेवक दत्ता गाडळकर म्हणाले की, “विज्ञान विषयाची भीती दूर करण्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या फिरत्या प्रयोगशाळेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील मुलींमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होईल आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला नवे आकाश मिळेल. आधुनिक युगातील आव्हाने पेलण्यासाठी ग्रामीण विद्यार्थिनी आता तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील. शिक्षण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणणारा हा उपक्रम भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


प्रत्येक तालुक्यात ही मोबाईल लॅब पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.”‘मोबाईल सायन्स लॅब’ ही अत्याधुनिक विज्ञान उपकरणांनी सज्ज अशी फिरती प्रयोगशाळा असून त्यामध्ये टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, रासायनिक प्रयोगांची साधने तसेच विविध विज्ञान किट्‌स उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून विज्ञान समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराभिमुख कौशल्यांचे मोफत सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगात स्पर्धात्मक संधी निर्माण होणार आहेत.


या सोहळ्याला विजय कराळे, अभय शेंडगे, भगवानराव काटे, विजय गाडळकर, पारुनाथ ढोकळे, साळवे सर, गांगुर्डे सर, आदित्य आगरकर, केदार खाडे, मच्छिंद्र पाटील, सुप्रिया कोतकर, मीनाक्षी तोडकर, सुप्रिया कोतकर, अश्विनी खताडे, झरेकर, नीता ढगे, अंजली शेळके, बाबासाहेब लोंढे, सुदाम डमाळ, म्हस्के सर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *