• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

वाडी-वस्तीवर पोहचविण्यात आली शासकीय योजनांची माहिती

ByMirror

May 3, 2026
बुरुडगावात समारोप; ग्रामस्थांसाठी अभियान ठरले प्रभावी

जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम; रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांचा जागर


बुरुडगावात समारोप; ग्रामस्थांसाठी अभियान ठरले प्रभावी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कामगार वर्गाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच गावोगावी मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप नगर तालुक्यातील बुरुडगाव येथे उत्साहात पार पडला.


या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करून अनेक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


समारोपीय कार्यक्रमाला जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, बुरुडगावचे सरपंच बापूसाहेब कुलट, तलाठी संभाजी ठोंबरे, उपसरपंच सिराज शेख, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर वाघ, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय शेळके, कृषी सहाय्यक मंदा भारती, सी.एच.ओ. प्रतिनिधी, डॉ. मनीषा लगड, सचिन चौधरी, अंगणवाडी सेविका जया जाधव, मुख्याध्यापक झिने सर, मुख्याध्यापिका थोरात मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद साळवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे आणि लाभार्थ्यांची नोंदणी करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमांतर्गत दरेवाडी गटातील निंबोडी, टाकळी काझी, मदडगाव, दशमीगव्हाण, चिंचोडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, नारायण डोह, वाळुंज, दरेवाडी, वाकोडी, खंडाळा, अरणगाव आदी गावांमध्ये विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून, पुढील काळातही हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे यांनी सांगितले. यावेळी युवक व बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत व्यवसाय मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांना विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.


तसेच सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची मोफत नोंदणी करून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य विषयक सेवांनाही या अभियानात विशेष प्राधान्य देण्यात आले. मोफत आरोग्य शिबिरांद्वारे नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्‍यक सल्ला व उपचार देण्यात आले. शासनाच्या विविध योजना, उद्योग, कृषी, कामगार व आरोग्य विषयक कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी जनकल्याण संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *