युवा सेनेची ‘राजा शिवाजी’ चित्रपटाद्वारे युवकांना प्रेरणा
छत्रपतींच्या विचारांनी नव्या महाराष्ट्राची उभारणी शक्य – योगेश गलांडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात युवा सेनेच्या वतीने युवा कार्यकर्त्यांना नुकतेच प्रदर्शित झालेले ‘राजा शिवाजी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम व जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. कोहिनूर मॉलमधील सिनेमागृहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले होते.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून युवा सेनेने हा प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. शिवसेनेचे मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात आला. राज्यातील लाखो युवा शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी हा चित्रपट पाहिला. अहिल्यानगर शहरात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या वेळी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक सचिन जाधव, विक्रम राठोड, जिल्हा प्रमुख अभिषेक भोसले, ओंकार शिंदे, अमोल हुंबे, सागर गलांडे, अमोल ठोकळ, राहुल जगधने, आजीनाथ शिरसाठ, शशिकांत संसारे, अवी कर्डिले, तुषार शेवाळे, संदीप मगर, विष्णु घुगे, पवन क्षीरसागर, महेश त्रिंबके, महेश थोरवे, रामदास नागरगोजे, अनिल गायकवाड, बागुल, निलेश शेवाळे, घनश्याम घोलप यांच्यासह युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्र राज्याची पायाभरणी झाली असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, आजचा आधुनिक व प्रगल्भ महाराष्ट्र घडविताना छत्रपतींच्या विचारांचा आधार घ्यावा लागेल. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले, ही एकात्मतेची प्रेरणा आजही तितकीच महत्त्वाची आहे.
योगेश गलांडे म्हणाले की, युवकांना छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रभर एक लाखांहून अधिक युवक-युवतींना हा चित्रपट दाखविण्यात आला असून, त्यातून राष्ट्रभक्ती व स्वाभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र दिन साजरा करताना केवळ उत्सव नाही तर आपल्या इतिहासाची, आपल्या अस्मितेची आणि आपल्या स्वाभिमानाची आठवण करून देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे केले. त्यांनी केवळ राज्य निर्माण केले नाही, तर न्याय, समता आणि धर्मनिरपेक्षतेचे मूल्य रुजवले.
आजच्या युवकांनी महाराजांच्या जीवनातून धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा शिकली पाहिजे. ‘राजा शिवाजी’ सारखे चित्रपट हे केवळ मनोरंजन नसून, ते इतिहासाचे जिवंत दर्शन घडवतात. अशा उपक्रमांमुळे युवकांना आपल्या संस्कृतीची जाणीव होते आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजच्या काळात तंत्रज्ञान, स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे युवक अनेकदा दिशाहीन होतात. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांना योग्य दिशा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
