• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

पब्लिक स्कूल वाळूंजच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

ByMirror

Jul 12, 2024
पब्लिक स्कूल वाळूंजच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

आषाढी वारीसाठी निघालेल्या विविध दिंडीचे विद्यार्थ्यांनी केले स्वागत

विठू नामाच्या गजराने शालेय परिसर दुमदुमले

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषीभूषण संबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठान संचलित पब्लिक स्कूल वाळूंजच्या शालेय विद्यार्थ्यांनी पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीचे स्वागत केले. तर शालेय विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून सर्वांचे लक्ष वेधले. वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकले मोठ्या उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते.


दिंडीत विठ्ठल-रुख्मिणी, ज्ञानेश्‍वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या वेशभुषेत विद्यार्थी अवतरले होते.दिंडीची सुरुवात विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तिचे पूजन करून करण्यात आली. दिंडीतील पालखी अग्रभागी ठेऊन ढोल-ताशांच्या गजरात चिमुकल्यांची दिंडी मार्गस्थ झाली होती. हातात भगव्या पताका व टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला. शाळेच्या मैदानावर दिंडीचा रिंगण सोहळा पार पडला. दिंडीचे पालक वर्गाने देखील मोठ्या उत्साहात स्वागत केले.


विद्यार्थ्यांनी राहुरी येथील धोंगडे गुरुजी पायी दिंडी आणि मांडवा (ता. पारनेर) येथील मांडव्य ऋषी दिंडी तसेच अकोला येथील दिलीप मंडलिक सायकल दिंडीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागताने पंढरपूरला निघालेले वारकरी भारावले.


प्राचार्य सोनल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती दिली. दिंडी यशस्वी करण्यासाठी शालेय वंदना मॅडम, गणेश खुडे आदींसह सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *