• Thu. Oct 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा कटिबद्ध! -विश्‍वजीत गायकवाड

ByMirror

Oct 8, 2026
राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

अहिल्यानगरात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात
राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी बैठक उत्साहात पार पडली. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजीत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची आगामी वाटचाल, ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्‍न आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दलित समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनहितकारी निर्णयांवर सविस्तर चर्चा करत आगामी उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले.


लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे झालेल्या या एकदिवसीय बैठकीची सुरुवात सकाळी दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सुधीर जांभूळकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. यानंतर पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे व्हर्च्युअल (दूरदृश्‍य) प्रणालीद्वारे मार्गदर्शनपर भाषण झाले. सर्व पाहुण्यांचे स्वागत बैठकीचे आयोजक तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष मनेष साठे यांनी केले.


सकाळच्या सत्रात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा परिचय व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दुपारच्या दुसऱ्या सत्रात पक्षाच्या प्रमुख महामंत्र्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये महामंत्री परिमलजी कांबळे यांनी संघटनात्मक जबाबदारी आणि कर्तव्ये’ यावर मार्गदर्शन केले, तर महामंत्री राहुल कांबळे यांनी चळवळ आणि पक्षीय मूल्ये यावर सखोल माहिती दिली.


पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ‘ग्राऊंड लेव्हल’चे विषय समजून घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये सामूहिक चर्चा पार पडली आणि विविध अडचणींवर तोडगा काढण्यात आला.


कार्यक्रमाच्या समारोप सत्रात विश्‍वजित गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मागील सहा महिन्यांतील कार्याचा आढावा, राबविलेले व आगामी नियोजित कार्यक्रम, साध्य केलेली उद्दिष्टे आणि समोरील आव्हाने यावर सविस्तर अहवाल सादर करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीचे यशस्वी आयोजन राज्य उपाध्यक्ष मनेष साठे यांनी केले होते. या बैठकीला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे नवनियुक्त महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *