बाबासाहेबांचा पोस्टर फाडल्याचा निषेध
महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांना काळे फासणार -मयुर बोचुघोळ
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस शहरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ, सागर शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदेश गायकवाड, गोपाल वर्मा, बंटी ढापसे, ओंकार लेंडकर, सुरेश लालबागे, सरचिटणीस रुदेश आंबाडे, उपाध्यक्ष अजित कोतकर, ओबीसी मोर्चाचे अनिल निकम, व्यापारी मोर्चाचे महेश गुगळे, यश शर्मा, विशाल मरकड, हर्षल बोरा, आशिष तापकिरे, महेश मचे, राहुल बत्तीन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्लोक घेतल्याचा निषेधार्थ जितेंद्र आव्हाड महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. या कृतीमुळे त्यांच्यावर राज्यभरात तीव्र भावना व्यक्त होत असताना नगर शहरातही त्याचे पडसाद पहावयास मिळाले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारले.
मयुर बोचुघोळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील नौटंकीकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून नव्या वादाला सुरुवात केली आहे. त्यांच्या कृतीतून बाबासाहेबांबद्दल त्यांची किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून, आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली. तर वारंवार महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांना शहरात फिरकू देणार नसल्याचे स्पष्ट करुन त्यांना काळे फासण्याचा इशाराही भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.