• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

भीमथडी साहित्य संमेलनात पै. नाना डोंगरे यांचा विशेष सन्मान

ByMirror

May 25, 2026
आमदार राहुल कुल यांच्याकडून कौतुक

ग्रामीण भागातील साहित्य, जनजागृती आणि समाजप्रबोधन कार्याची दखल


आमदार राहुल कुल यांच्याकडून कौतुक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला चालना देत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा चौफुला केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे आयोजित राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलनात विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.


दि. 23 व 24 मे रोजी दोन दिवस पार पडलेल्या या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे, संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांच्यासह पै. डोंगरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी साहित्य, संस्कृती आणि ग्रामीण जनजागृतीचा संगम घडवणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.


पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गावागावांत साहित्याची गोडी निर्माण व्हावी, ग्रामीण प्रतिभेला योग्य दिशा मिळावी आणि सामाजिक प्रश्‍नांवर जागृती व्हावी या उद्देशाने त्यांनी विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.


समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण अभियान, रक्तदान शिबिरे यांसारखे विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गावपातळीवर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे.


ग्रामीण साहित्य चळवळीला बळ देण्यासाठी पै. डोंगरे यांनी आतापर्यंत आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून, ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यांच्या या ग्रामीण साहित्य चळवळीला नवी ऊर्जा देणाऱ्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार राहुल कुल यांनी पै. नाना डोंगरे यांच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक करत, “ग्रामीण भागात साहित्य आणि समाजकारणाची प्रभावी चळवळ उभी करण्याचे काम डोंगरे यांनी केले आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *