• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

ByMirror

May 25, 2026
मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचा उपक्रम

मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचा उपक्रम


मराठी राजभाषा ही महाराष्ट्राची ज्ञानभाषा होईल -नरेंद्र फिरोदिया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या (अहिल्यानगर) वतीने राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षा 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांच्या भाषिक उपयोजन कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने पाठ्यपुस्तक व व्याकरणावर आधारित ही राज्यस्तरीय परीक्षा आयोजित करण्यात आली होती.


हा सोहळा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. फिरोदिया म्हणाले की, “मराठी राजभाषा ही महाराष्ट्राची ज्ञानभाषा होईल. मराठी भाषेने राज्याला समृध्द केले व या भाषेने अनेकांना समृध्द केले. अल्प कालावधीतच मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले असून, महाराष्ट्रात मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुलोचना क्षीरसागर व त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत उत्कृष्ट व नियोजनबद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता व आकर्षण निर्माण होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आयोजित या परीक्षेला तब्बल दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्यापैकी सुमारे 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गर्दीने खचाखच भरलेल्या माऊली सभागृहाबाबत उल्लेख करताना फिरोदिया यांनी “पुढील कार्यक्रमासाठी स्टेडियम घ्यावे लागेल” अशी मिश्‍किल टिप्पणीही केली.


संजय कळमकर म्हणाले की, मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, समृद्ध इतिहास लाभलेली मराठी ही महाराष्ट्राची आद्य व सांस्कृतिक ज्ञानभाषा आहे. “मातृभाषा हीच खरी ज्ञानभाषा ठरल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होऊ शकतो,” मराठी भाषेतून शिकून अनेक व्यक्ती उच्च पदावर आपले कर्तृत्व सिध्द करत असल्याचेही त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, संभाजीनगरचे मराठी रसिक भूलतज्ञ डॉ. विजय दळवी, मा. नगरसेवक नितीन शेलार, बालसाहित्यिक नारायण खरात, अंबिशन बायोलॉजी अकॅडमीचे रवींद्रजी काळे, शिक्षक लहू बोराटे, मराठी अध्यापक संघाचे रंगनाथ सुंबे, कवी ज्ञानदेव उंडे, कायझेन अकॅडमीचे महेश डाळिंबकर, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, माध्यमिक शिक्षण सोसायटी संचालक महेंद्र हिंगे, सुनील दानवे, सुरज घाटविसावे, मनपा शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी कैलास गुंजाळ, मुख्याध्यापक सुभाष येवले, केंद्रप्रमुख अरुण पालवे, प्राचार्या संगीता पाठक, मुख्याध्यापिका वर्षा शेलार, प्रसाद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यवाहक अमोल क्षीरसागर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *