• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

जायंट्स ग्रुपचा सामाजिक उपक्रमाने औषधी विक्रेता दिवस साजरा

ByMirror

Sep 26, 2022

औषध निर्माण अधिकारी व शहरातील ज्येष्ठ औषध विक्रेत्यांचा सन्मान

औषध विक्रेते रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मुख्य दुवा -संजय गुगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक औषधी विक्रेता (फार्मासिस्ट डे) दिवसनिमित्त महापालिका, जिल्हा रुग्णालय व बुथ हॉस्पिटलचे औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) व शहरातील ज्येष्ठ औषध विक्रेते यांचा सन्मान करण्यात आला. तर कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवून उत्कृष्ट रुग्ण सेवा देणारे बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांचा विशेष सन्मान करुन बाबावाडी बालगृह येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप करुन सामाजिक उपक्रमाने जागतिक औषधी विक्रेता दिवस साजरा करण्यात आला.


आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर, डॉ. भक्ती कटारिया, नूतन गुगळे, अमित मुनोत, पूजा पाथुरकर, बाबावाडीच्या अधीक्षका सुमन कांबळे आदी उपस्थित होते.


राजेंद्र कटारिया म्हणाले की, फार्मासिस्ट म्हणजे एक प्रकारे डॉक्टरच आहे. डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर देखील फार्मासिस्ट सर्वसामान्य नागरिकांना योग्य औषधं देऊन, त्यांना औषधांबद्दल मार्गदर्शन करत असतो. आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सर्व फार्मासिस्ट योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक संजय गुगळे म्हणाले की, औषध विक्रेते रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मुख्य दुवा म्हणून योगदान देत आहेत. अनुभवाच्या जोरावर औषध विक्रेत्यांनी समाजात विश्‍वासहर्ता निर्माण केली. कोरोना काळात औषध निर्माण अधिकारी व फार्मासिस्टनी मोठे योगदान दिले. तर बुथ हॉस्पिटलने कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवून सर्वसामान्यांना आधार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भक्ती कटारिया यांनी आरोग्य क्षेत्रात डॉक्टर व फार्मासिस्ट एका नाण्याच्या दोन बाजू असून, दोघांचे कार्य एकमेकांवर आधारलेले असून, समाजाला उत्तम आरोग्य देणे या एकच ध्येयाने दोन्ही कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर यांनी जायंट्स ग्रुपच्या सेवा सप्ताहातंर्गत सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.


देवदान कळकुंबे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्ट मोठा घटक असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी योगदान देत आहे. कोरोनाच्या काळात देखील फार्मासिस्टनी मोठे योगदान दिले. त्यांनी दिलेली सेवा न विसरता येणारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) भाऊसाहेब सुडके, विकास गीते, जावेद रंगरेज, जयश्री म्हसे, किरण खरात, सतीश मिसाळ, वैशाली बागुल, पूजा शिंदे, जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक संजय गुगळे, अनिल गांधी, संदीप धोका, नरोटे, तेजल कदम, शाहिद काझी आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी यांनी केले. आभार नूतन गुगळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *