इसळकच्या ब्रह्मचैतन्य महाराज गोशाळेला एक दिवसाचा चारा-पाणी खर्च!
दुष्काळी पार्श्वभूमी व कार्तिक मासानिमित्त सेवाभावी उपक्रम;
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कार्तिक मासाचे औचित्य आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुक्या जनावरांच्या सेवेसाठी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. इसळक (ता. नगर) येथील निसर्ग सृष्टी गोपाल संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोशाळेला चारा वाटप करून संस्थेच्या वतीने गोशाळेचा एक दिवसाचा चारा व पाण्याचा संपूर्ण खर्च देण्यात आला. या उपक्रमातून 610 गोवंशाच्या संगोपनासाठी मोलाचा हातभार लावण्यात आला.
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या प्रकल्प प्रमुख स्वीटी पंजाबी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नय्यर, गीता माळवदे, सीमा गुलाटी, ईशा मल्होत्रा, शीलू मक्कर, सिमी मक्कर, नंदिनी जग्गी, सुनीता सहगल, डॉ. बिंदू शिरसाठ, सुशीला मोडक, सुलभा मोडक, अभिलाषा मदान, कविता काथेड, आरती लोहाडे, वीणा झालानी, उर्मिला झालानी, पूनम धिंग्रा, सुरेखा मनियार, शिल्पा नय्यर, नीतू सलुजा आदी महिला उपस्थित होत्या.
निसर्ग सृष्टी गोपाल संस्था ही गोवंशाचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन या पवित्र कार्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. कत्तलखान्यांतून सोडवून आणलेल्या निराधार, भाकड, दूध न देणाऱ्या, अपंग तसेच वृद्ध गायींना संस्थेमार्फत निवारा, चारा, पाणी आणि आवश्यक वैद्यकीय व दैनंदिन देखभाल उपलब्ध करून दिली जाते. सध्या या गोशाळेत 610 गोवंशाचे संगोपन केले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने गोवंशाचे संगोपन करणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी दररोज सुमारे पाच टन चाऱ्याची आवश्यकता असून, चाऱ्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो. तसेच दररोज चार पाण्याच्या टँकरची आवश्यकता असून, त्यासाठी दोन हजार रुपये खर्च होतो. अशा प्रकारे चारा व पाण्यासाठी दररोज 17 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. दुष्काळी परिस्थितीत हा खर्च भागविणे गोशाळेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
ही गरज लक्षात घेऊन सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने गोशाळेचा एक दिवसाचा चारा व पाण्याचा संपूर्ण खर्च निसर्ग सृष्टी गोपाल संस्थेचे गौतम कराळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. केवळ धार्मिक परंपरा म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून गोसेवेचे महत्त्व जपत महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून ती माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी आहे. दुष्काळाच्या काळात माणसांबरोबरच मुक्या जनावरांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः निराधार आणि वृद्ध गायींची काळजी घेणाऱ्या गोशाळांना मोठ्या प्रमाणात चारा व पाण्याची गरज असते. अशा वेळी समाजातील प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सेवाप्रीतच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन केलेला हा छोटासा प्रयत्न मुक्या जीवांच्या संगोपनासाठी उपयोगी ठरेल अशी भावना व्यक्त केली.
उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख स्वीटी पंजाबी म्हणाल्या की, कार्तिक मास हा सेवा, दानधर्म आणि पुण्यकर्माचा संदेश देणारा महिना आहे. या काळात दुष्काळी परिस्थितीमुळे गोवंशाच्या चारा-पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. 610 गायींचे संगोपन करणाऱ्या गोशाळेला दररोज मोठ्या प्रमाणात चारा आणि पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे केवळ औपचारिक मदत करण्याऐवजी गोशाळेचा एक दिवसाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. मुक्या जनावरांना आपले दुःख शब्दांत सांगता येत नाही; त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून मदतीसाठी पुढे येणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

