पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार जनतेवर कशासाठी?; संसद विस्ताराआधी कामकाजाचा हिशेब द्या
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची आंदोलनाची घोषणा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला आरक्षणाला पूर्ण पाठिंबा असला, तरी संसद सदस्यसंख्या वाढविण्याच्या प्रस्तावाला पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने विरोध दर्शविला आहे. संसदेतील निष्क्रिय कामकाज, वाढत्या सुविधा आणि पेन्शनवरील खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार जनतेवर टाकू नये, अशी भूमिका घेत दोन्ही संघटनांनी या प्रस्तावाविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. महिलांना संसदेत आरक्षण मिळालेच पाहिजे; मात्र त्यासाठी संसद सदस्यसंख्या वाढवून जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी मांडली.
संघटनांनी उपस्थित केलेल्या भूमिकेनुसार, जनतेच्या पैशातून चालणारी संसद जनतेच्या प्रश्नांवर किती प्रभावीपणे काम करते, याचा आधी हिशेब दिला पाहिजे. संसदेचे कामकाज वर्षानुवर्षे निष्प्रभ राहणार आणि त्याचवेळी सदस्यसंख्या, सुविधा व पेन्शनवरील खर्चही वाढणार, ही लोकशाहीची सेवा नव्हे, असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे. संसदेमधील चर्चेची गुणवत्ता, कामकाजाचे दिवस, जनतेप्रती उत्तरदायित्व आणि सार्वजनिक निधीचा विनियोग यांचे मूल्यमापन झाल्याशिवाय सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिला आरक्षण हा समान प्रतिनिधित्वाचा आणि लोकशाहीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झालीच पाहिजे. मात्र, महिला आरक्षणाच्या नावाखाली संसदेचा विस्तार आणि जनतेवरील आर्थिक भार अपरिहार्य असल्याचे गृहीत धरू नये, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे. प्रतिनिधित्व वाढविण्याचे पर्याय पारदर्शकपणे तपासले जावेत. त्याचबरोबर संसदीय कामकाजाची जबाबदारीही निश्चित करण्यात यावी, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे.
संघटनांच्या मते, भारतीय संसद ही केवळ सत्तेची केंद्रीकृत रचना न राहता राष्ट्रीय तिरंगा धारणालयाची गंगोत्री बनली पाहिजे. येथे लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, घटनात्मक नैतिकता आणि रिकॉन्शिअो शासनतत्त्व यांना सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे. राष्ट्रनिर्मितीचे ज्ञान संसदेत एकत्रित होऊन त्याचे रूपांतर लोककल्याणकारी निर्णयांमध्ये झाले पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले; आता लोकशाहीला सामूहिक विवेक, उत्तरदायित्व आणि जनहिताच्या कृतीतून अर्थपूर्ण बनविण्याची वेळ आली आहे, असे संघटनांचे प्रतिपादन आहे.
भारत हे संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठेच्या केंद्राभिमुख स्पर्धेचे राष्ट्र बनू नये. त्याऐवजी तिरंगा, संविधान आणि लोककल्याणाच्या मूल्यांवर उभे राहिलेले राष्ट्रधारणालय बनावे, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने केले आहे. संसद विस्ताराच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी होणारा खर्च, पेन्शनवरील परिणाम, प्रतिनिधित्वाची पद्धत आणि संसदेच्या कामगिरीशी त्याचा असलेला संबंध यांचा स्पष्ट हिशेब जनतेसमोर मांडण्यात यावा, असे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

