अहिल्यानगरच्या हुतात्मा स्मारकात मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली!; शहीद पोलीस व जवानांच्या शौर्याला मानवंदना
हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला!
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांच्या स्मृतींना अहिल्यानगरमध्ये भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब, मराठी पत्रकार परिषद, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्पचक्र अर्पण करून तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून शहीद वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, सचिव हरिश हरवाणी, खजिनदार विजय कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, प्रकल्प प्रमुख सुनील छाजेड, धनंजय भंडारे, अरविंद पारगावकर, दिलीप कुलकर्णी, जालिंदर बोरुडे, रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या निवासच्या प्रमुख ज्योती मोकळ, बिट्टू मनोचा, प्रशांत मुनोत, कैलाश नवलानी, आशा पालवे, साहेबराव काते, दीपिका शेलार, राजेंद्र घोडके, लिओ क्लबचे अध्यक्ष हर्षवर्धन किथानी, गुरनूरसिंह वधवा आदींसह नागरिक उपस्थित होते.
शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या शौर्याला मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेच्या जिजामाता कन्या निवासमधील विद्यार्थिनींनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या बलिदानाला अभिवादन करत ‘ऑपरेशन सिंदूर’मधील भारतीय सैन्याच्या धाडसी एअर स्ट्राइकवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या सादरीकरणातून भारतीय सैन्याचे शौर्य, देशभक्ती आणि दहशतवादाविरुद्धचा निर्धार प्रभावीपणे व्यक्त करण्यात आला.
प्रास्ताविकात अरविंद पारगावकर म्हणाले की, भारताची शांतता आणि एकात्मता भंग करण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. मात्र, भारतीय जवान आणि पोलीस दलाने प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी प्रसंग होता. या हल्ल्याचा मुकाबला करताना पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व शौर्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले.
उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, 26/11 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड आणि मानवतेला काळिमा फासणारा होता. या हल्ल्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि लष्करी जवानांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा मुकाबला केला. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य आणि शौर्य शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. या हल्ल्यात अनेक कर्तबगार पोलीस अधिकारी आणि जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2008 मध्ये महापालिकेची निवडणूक सुरू असतानाच्या काळातील या हल्ल्याच्या आठवणी सांगताना त्यांनी त्या प्रसंगाचे गांभीर्य आणि भीषणता विशद केली. दहशतवादाला कोणताही जात किंवा धर्म नसतो. समाजात अशांतता निर्माण करणे आणि शांतता भंग करणे हाच दहशतवाद्यांचा उद्देश असतो. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी एकजुटीने दहशतवादाचा निषेध करून राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आणि मेणबत्त्या प्रज्वलित करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले, तर सुनील छाजेड यांनी आभार मानले.

