• Fri. Nov 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

किडनी विकार असलेल्या रुग्णांचे जीवनमान उंचवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलचे डायलेसिस विभाग करतोय -डॉ. गोविंद कासट

ByMirror

Nov 27, 2026
30 जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन, दररोज 80 ते 90 रुग्णांचे डायलेसिस

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत किडनी विकार तपासणी शिबिराला प्रतिसाद


डायलेसिस विभागाची आरोग्यसेवेत मोठी झेप; पाच वर्षांत एक लाखांहून अधिक डायलिसिस!


30 जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन, दररोज 80 ते 90 रुग्णांचे डायलेसिस


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह राज्यातील अद्ययावत व प्रशस्त डायलेसिस सेंटर म्हणून जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलचा डायलेसिस विभाग पुढे आला आहे. या विभागात जर्मन टेक्नॉलॉजीची 30 मशीन रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असून, अद्ययावत आरओ सिस्टीम आणि रिप्रोसेसिंग युनिटची सुविधा आहे. मागील पाच वर्षांत या विभागात एक लाखांपेक्षा अधिक डायलिसिस करण्यात आले असून, दररोज 80 ते 90 डायलिसिस केल्या जात आहेत. सर्वसामान्य घटकातील रुग्णांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत असल्याचे प्रतिपादन नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. गोविंद कासट यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित मोफत किडनी विकार तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फिजिशियन डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. प्रकाश कांकरिया, बाबूशेठ लोढा, वसंत कटारिया, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोविंद कासट पुढे म्हणाले की, पांढरी व पिवळी कावीळ यांचे निदान आणि उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र डायलेसिसची व्यवस्था आहे. मागील दहा वर्षांपासून डायलेसिस घेणारे रुग्ण आनंदी जीवन जगत आहेत. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अद्ययावत आरोग्य सुविधांचा सर्वसामान्य रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य मंदिर उभारून आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. समाजाची गरज ओळखून विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे धाडस हॉस्पिटलने दाखविले आहे. सर्व आरोग्यसेवा एका छताखाली आणण्यात आल्या आहेत. नेत्रालयाच्या माध्यमातून देखील सव्वा लाखाच्या पुढे यशस्वी शस्त्रक्रिया नेत्रालय विभागाने केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. प्राजक्ता पारधे म्हणाल्या की, फक्त डायलेसिस म्हणजे किडनीचे आजार नाहीत. मधुमेहामुळे किडनीचे आजार वाढत आहेत. किडनी सामान्य स्थितीत आहे की नाही, याची तपासणी करणे देखील आवश्यक आहे. वयाच्या चाळिशीनंतर किडनीची तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. यासाठी शिबिराचा लाभ घेऊन सर्वसामान्यांनी तपासणी करावी.
किडनी हा शरीराचा महत्त्वाचा भाग असून, शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्याचे कार्य ती करते. सुदृढ आरोग्यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. किडनीच्या आजारांचा गंभीर धोका टाळण्यासाठी वेळेत तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


या मोफत किडनी विकार तपासणी शिबिरात अंगावर सूज येणे, लघवी कमी होणे, लघवी लाल होणे तसेच किडनीच्या जंतुसंसर्गासंदर्भातील तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय सोनोग्राफी, रक्त व लघवीच्या तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात करण्यात आल्या. या शिबिरात एकूण 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डायलेसिसची मोफत सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर बाबूशेठ लोढा यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *