सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था व सत् कबीर बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना “महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला. नाशिक रोड येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ह्रद्यरोग तज्ञ डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी व मॉडेल रितिका साळुंखे यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य आयोजक भूषण सरदार, मॉडेल स्मिता माटेकर, अभिनेते डॉ. गणेश व्यवहारे, लेखिका अश्विनी सांगळे, वैशाली सोनवणे, राजेंद्र हेलोडे आदी उपस्थित होते.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही सातत्याने सुरू आहे.
महिला बचत गट मेळावे, युवा संमेलने, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून ग्रामीण समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल निमगाव वाघा सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब (पिंटू) जाधव, उद्योजक दिलावर शेख, सोसायटीचे संचालक अजय ठाणगे, कवयित्री सरोज आल्हाट, मयुर काळे यांनी डोंगरे यांचे अभिनंदन करुन पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
