विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अनापवाडी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. वारकरी वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आणि तुळशीची रोपे घेऊन विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात दिंडी काढत परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.
विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विविध सण-उत्सवांचे महत्त्व समजावे तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचे संस्कार बालवयातच रुजावेत या उद्देशाने शाळेच्या वतीने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या परिसरातून निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड गजर करत अभंग, हरिपाठ आणि भजनांच्या तालावर उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि पारंपरिक पोशाखातील चिमुकल्यांमुळे संपूर्ण परिसर पंढरीच्या भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. ग्रामस्थांनीही या दिंडीचे स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील कोंडीराम माळी, उपाध्यक्ष समर्थ अनाप, रोहिदास कानडे, एजाज तांबोळी, नारायण अनाप, संदीप अनाप, विलास मोरे, कुमार अंत्रे, राजेश अंत्रे, गेनू भाऊ अनाप, संजय सजन, बाळासाहेब अनाप, अलका अनाप, धनवट मॅडम, दिघे मॅडम, सुरेखा अनाप, शुभांगी अंत्रे, शकुंतला अनाप, सविता अनाप तसेच पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी विलास मोरे, चंद्रभान अनाप, संदीप अनाप, कुणाल अनाप, दिनेश अनाप आणि शुभम अनाप यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शाळेचे शिक्षक वायदंडे सर आणि घोलप सर यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

