• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात; आठरे पाटील स्कूलचे वर्चस्व

ByMirror

Jul 28, 2026
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूलचे तीन सामने अनिर्णित

पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी


ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूलचे तीन सामने अनिर्णित


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शालेय फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला सोमवारी (दि. 27 जुलै) उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला असून, पहिल्याच दिवशी विविध वयोगटांतील सहा सामने खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये आठरे पाटील स्कूलने तीनही सामन्यांत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यातील तीन सामने अत्यंत अटीतटीचे होत दोन अनिर्णित आणि एक बरोबरीत सुटला.


अहमदनगर महाविद्यालयाच्या सौजन्याने तसेच अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांचे संघ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून मैदानावर सुरुवातीपासूनच क्रीडाप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली.
स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना 16 वर्षांखालील मुलांच्या गटात आठरे पाटील स्कूल आणि अशोकभाऊ फिरोदिया स्कूल यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात आठरे पाटील स्कूलने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत 3-1 अशा फरकाने विजय मिळविला. आठरे पाटीलकडून शौर्य भंडारीने 17 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सोमनाथ तावडेने 24 व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी भक्कम केली. सामन्याच्या उत्तरार्धात अशोक चंदने 55 व्या मिनिटाला तिसरा गोल झळकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. अशोकभाऊ फिरोदिया स्कूलला केवळ एकच गोल करण्यात यश आले.


14 वर्षांखालील मुलांच्या गटातही आठरे पाटील स्कूलने विजयी परंपरा कायम राखली. अशोकभाऊ फिरोदिया स्कूलविरुद्धच्या या सामन्यात देहान जाधवने 22 व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. संपूर्ण सामन्यात आठरे पाटीलच्या बचावफळीने भक्कम कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करू दिला नाही आणि 1-0 असा विजय नोंदविला.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात आठरे पाटील स्कूल आणि पोदार स्कूल यांच्यात अत्यंत रंगतदार सामना झाला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. आठरे पाटील स्कूलकडून इरम कडूस आणि प्रांजल भोर यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला. पोदार स्कूलकडून काव्या झावरे हिने एकमेव गोल नोंदविला.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यातील सामना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी सातत्याने आक्रमण केले, मात्र कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आले नाही. परिणामी हा सामना 0-0 असा अनिर्णित राहिला.


14 वर्षांखालील मुलांच्या गटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यातील सामना विशेष लक्षवेधी ठरला. पहिल्या सत्रात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटकडून वेदांत बांगरने सुंदर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सत्रात आयकॉन पब्लिक स्कूलकडून विहान कासारने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र अखेर सामना 1-1 अशा बरोबरीत संपला.


16 वर्षांखालील मुलांच्या गटातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यातील सामना देखील तितकाच रोमांचक ठरला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट बचाव आणि वेगवान आक्रमणाचे प्रदर्शन केले. मात्र, गोलपोस्टसमोरच्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात दोन्ही संघांना अपयश आल्याने सामना 0-0 असा अनिर्णित राहिला.
यंदाची स्पर्धा लीग-कम-नॉकआऊट पद्धतीने खेळविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला साखळी फेरीत अधिक सामने खेळून आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. एका पराभवानंतर स्पर्धेबाहेर पडण्याऐवजी संघांना पुनरागमनाची संधी उपलब्ध असल्याने यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची आणि रोमांचक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *