• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्सच्या 8 व्या आंतरशालेय स्पर्धेला प्रारंभ

ByMirror

Jul 28, 2026
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार


53 संघ, 100 हून अधिक सामने आणि चार गटांतील चुरशीची लढत; मुला-मुलींच्या शालेय संघ सहभागी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देत शालेय स्तरावरील फुटबॉल संस्कृती बळकट करणाऱ्या फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित 8 व्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला सोमवार (दि.27 जुलै) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर फुटबॉलच्या रोमांचकारी लढतींना सुरुवात झाली. यंदाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 53 संघ सहभागी झाले असून 12 वर्षांखालील मुले, 14 वर्षांखालील मुले, 16 वर्षांखालील मुले आणि 16 वर्षांखालील मुली अशा चार गटांत 100 हून अधिक सामने खेळविण्यात येणार आहेत.


ही स्पर्धा अहमदनगर महाविद्यालयाच्या सौजन्याने तसेच अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी सहभागी सर्व शालेय संघांच्या कर्णधारांच्या उपस्थितीत फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्‍वस्त तथा अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि शिवाजियन्स स्पोर्ट्‌स क्लबचे अध्यक्ष तथा फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पाहुण्यांनी फुटबॉलला किक मारून पहिल्या सामन्याचा प्रारंभ केला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी, फुटबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रदीप जाधव, उपाध्यक्ष खालिद सय्यद, कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे, फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या मुख्य आयोजन समितीच्या सदस्य पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, अभय साळवे, अभिषेक सोनवणे यांच्यासह शिवाजियन्स स्पोर्ट्‌स क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच, खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्राचार्य डॉ. अभिजीत कुलकर्णी म्हणाले की, फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीने जिल्ह्यात फुटबॉल खेळाची भक्कम पायाभरणी केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा मोठे व्यासपीठ ठरते. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी सक्षम होणे ही काळाची गरज आहे. अहमदनगर महाविद्यालयाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिले असून भविष्यातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, फिरोदिया शिवाजियन्सची आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा ही केवळ सामने खेळविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती जिल्ह्यातील फुटबॉल चळवळीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. दरवर्षी नवीन शाळा, नवीन संघ आणि नव्या खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. विशेष म्हणजे मुलांबरोबरच मुलींचे संघही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने महिला फुटबॉललाही नवी दिशा मिळत आहे. प्रत्येक खेळाडूने मैदानात स्वतःचे सर्वोत्तम प्रदर्शन करावे. जीवन हेही एका मोठ्या मैदानासारखेच आहे. येथेही संघर्ष, स्पर्धा आणि अडचणी येतात. काही वेळा पराभव स्वीकारावा लागतो; मात्र पराभव म्हणजे शेवट नसतो. सातत्य, मेहनत, आत्मविश्‍वास आणि शिस्त यांच्या जोरावर यश नक्की मिळते. त्यासाठी स्वतःवर विश्‍वास ठेवून सातत्याने सराव करणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. तर स्पर्धेसाठी अहमदनगर महाविद्यालय देत असलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.


मनोज वाळवेकर म्हणाले की, शहरात फुटबॉल हा आज लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो, त्यामागे अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. फिरोदिया शिवाजियन्सने केवळ उत्कृष्ट खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक, पंच आणि क्रीडा व्यवस्थापक घडविण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. शालेय वयात योग्य प्रशिक्षण आणि स्पर्धा मिळाल्यास खेळाडूंच्या गुणवत्तेत मोठी भर पडते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे ते म्हणाले.


फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीने शालेय फुटबॉलला दिलेल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे या स्पर्धेने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील शालेय फुटबॉलमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक वर्षी स्पर्धेची व्याप्ती वाढत असून खेळाडूंची संख्या आणि दर्जाही उंचावत असल्याचे चित्र यंदाच्या स्पर्धेतही पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा लीग-कम-नॉकआऊट पद्धतीने खेळविण्यात येत असून प्रत्येक संघाला साखळी फेरीत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एका पराभवामुळे स्पर्धेबाहेर पडण्याऐवजी प्रत्येक संघाला अधिक सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, अनुभवी पंचांची नियुक्ती, खेळाडूंसाठी आवश्‍यक वैद्यकीय सुविधा आणि व्यावसायिक व्यवस्थापन यामुळे या स्पर्धेची राज्यभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिस्टीन अब्राहम यांनी केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रियंका सूर्यवंशी या फिजिओ म्हणून कार्यरत आहेत. पंच म्हणून शशांक वाल्मिकी, सोनिया दोसानी, प्रकाश कनोजिया, विल्यम राज आणि वैभव मनोदिया हे सामने नियंत्रित करीत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *