• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘पंचायत राज जेन जी’ लोकचळवळीची घोषणा

ByMirror

Jul 28, 2026
‘पंचायत राज जेन जी’ लोकचळवळीची घोषणा

ग्रामीण राजकारणाला आधुनिक विचारांची नवी दिशा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार


‘वंशवाद नव्हे, ज्ञान आणि लोकसेवा हाच उमेदवाराचा निकष असावा’ -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची पारंपरिक आणि कालबाह्य चौकट बदलून ग्रामविकासाला आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख दिशा देण्यासाठी ‘पंचायत राज जेन जी’ या राज्यव्यापी लोकचळवळीची घोषणा पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. या चळवळीची माहिती देताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी ग्रामीण नेतृत्वाची नव्याने उभारणी करण्याची गरज अधोरेखित करत, गावांचा कारभार वंशपरंपरा, पैसा किंवा राजकीय वर्चस्वावर नव्हे तर युवा शक्तीच्या ज्ञान, लोकसेवा आणि कार्यक्षमतेच्या आधारावर चालला पाहिजे, असे प्रतिपादन केले.


ॲड. गवळी म्हणाले की, आजच्या काळात गावांच्या विकासासाठी पारंपरिक राजकारण पुरेसे राहिलेले नाही. बदलत्या काळानुसार ग्रामपंचायतींमध्ये आधुनिक विचारांचे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेले आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व निर्माण होणे आवश्‍यक आहे. याच उद्देशाने ‘पंचायत राज जेन जी’ ही लोकचळवळ सुरू करण्यात आली असून राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, ‘जेन जी’ म्हणजे केवळ तरुण वयोगट नव्हे, तर आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, संविधानिक मूल्ये आणि लोकहिताची जाणीव असलेली नवी विचारसरणी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवारांची निवड ही केवळ घराणेशाही, आर्थिक ताकद किंवा जातीय समीकरणांवर न होता त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि विकासाच्या दृष्टिकोनावर व्हायला हवी.
यावेळी त्यांनी आदर्श ग्रामनेत्यामध्ये असावेत असे काही महत्त्वाचे गुणही स्पष्ट केले. जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत भान, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्याचे नियोजन, रेन गेन बॅटरीसारख्या संकल्पना, ठिबक व तुषार सिंचनाचा प्रसार, शाश्‍वत शेतीचा आराखडा, डिजिटल प्रशासन, भूजल पुनर्भरण, हवामान बदलाच्या परिणामांवर उपाययोजना तसेच सार्वजनिक निधीचा पारदर्शक आणि प्रामाणिक वापर करण्याची क्षमता असलेले नेतृत्वच गावांना विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.


ॲड. गवळी यांनी विद्यमान ग्रामीण राजकारणावरही टीका केली. अनेक वर्षांपासून पैसा, जात, धर्म आणि खोट्या आश्‍वासनांच्या आधारावर ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखणाऱ्या प्रवृत्तींमुळे गावांचा अपेक्षित विकास झाला नाही. पाणीटंचाई, बेरोजगारी, पर्यावरणाचा ऱ्हास आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या समस्या अधिक गंभीर होत गेल्या. त्यामुळे या जुन्या राजकीय संस्कृतीला पर्याय म्हणून नव्या विचारांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिवर्तनासाठी ‘त्रि-शक्ती’ हा मूलमंत्र असल्याचे सांगत त्यांनी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या तीन मूल्यांवर आधारित नेतृत्व उभे करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकभक्ती म्हणजे जनतेलाच सत्तेचा खरा मालक मानून तिच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे. ज्ञानभक्ती म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, संविधान आणि आधुनिक प्रशासनशास्त्राच्या आधारे निर्णय घेणे, तर कर्मभक्ती म्हणजे केवळ भाषणबाजी किंवा आश्‍वासनांवर न थांबता प्रत्यक्ष मैदानात उतरून विकासकामे पूर्ण करण्याची वृत्ती होय.
“ही त्रिसूत्री स्वीकारल्यास ग्रामीण भागात पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख नेतृत्व तयार होईल. भ्रष्टाचार, अज्ञान आणि स्वार्थी राजकारणाला या नव्या विचारसरणीसमोर टिकणे कठीण जाईल. गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक असला पाहिजे आणि ग्रामपंचायत ही लोकसेवेचे प्रभावी माध्यम बनली पाहिजे,” असेही संघटनेच्या वतीने म्हंटले आहे.


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने राज्यभर ‘पंचायत राज जेन जी’ या लोकचळवळीच्या माध्यमातून ग्रामस्थ, युवक, महिला, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विकासाभिमुख, तंत्रज्ञानस्नेही आणि लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व पुढे आणण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या चलवळीसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *