• Tue. Jul 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद शेख यांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर

ByMirror

Jul 21, 2026

जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार 25 जुलै रोजी निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. ते स्वत: एक उत्कृष्ट कुस्तीपटू होते, त्यांनी अनेक खेळाडू देखील घडविले आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे, या विचारातून त्यांनी सातत्याने काम केले आहे.


शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी ज्या-ज्या गावांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी लोकसहभागातून शाळा विकासाची चळवळ उभी केली. किन्ही (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारती उभारण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


विशेष म्हणजे चाँद शेख हे उत्कृष्ट पोवाडा गायक म्हणूनही परिचित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच विविध महापुरुषांच्या कार्यावर आधारित पोवाडे सादर करून ते इतिहास आणि संस्कृती जतनाचे कार्य करत आहेत. या साहित्य संमेलनात ते आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर अभंग सादर करणार आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *