10 वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वर्गीय माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या जिल्ह्यातील 10 वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांना चादर व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गरजांची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला.
कायनेटिक चौक येथील यश ग्रॅण्ड हॉटेलमध्ये प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी विविध वस्तीगृहांचे अधीक्षक व मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले चादर व ब्लँकेटचे साहित्य पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा. शशीकांत गाडे, डॉ. विवेक भापकर, प्रा मेधताई काळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश माधवराव मुळे, उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे, सचिव प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, खजिनदार बजरंग पाडळकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, डॉ महेश मुळे, डॉ. लक्ष्मण कदम, प्राचार्य हनुमंतराव कणसे, प्रा लालाचंद हराळ, मसाप जिल्हा प्रमुख प्रा गणेश भगत, महेश मुळे निलेश काळदाते, म्हस्के सुनील, यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त, अनेक सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. शशीकांत गाडे म्हणाले की, “स्व. शिक्षणमहर्षी माधवराव मुळे हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, तर ते समाजासाठी जगणारे एक प्रेरणास्थान होते. त्यांनी आयुष्यभर समाजकारण, शिक्षण आणि दुर्बल शेतकरी घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले. त्यांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची परंपरा आजही प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे चालू आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांचे जीवन हेच देशाचे भविष्य आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी आहे. आजच्या या चादर-ब्लँकेट उबदार कपडे वाटपासारखे उपक्रम हे केवळ मदत नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानने आजवर अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या स्वरूपात केली असून आरोग्य शिबीर ,वृक्षारोपण ,व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धा, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, आयोजित करून समाजामध्ये अभिनव उपक्रम राबवण्याच कार्य प्रतिष्ठान सातत्याने करत आहे प्रतिष्ठानच्या या कार्याची सर्वांनी कौतुक केले.
