• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व जैन युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांमध्ये अवयवदान प्रबोधन

ByMirror

May 2, 2026
अवयवदानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा उपक्रम

अवयवदानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात जैन ओसवाल युवक संघाच्या वतीने आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या सहकार्याने अवयवदान प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षकांमध्ये जनजागृती करून अवयवदानाचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.


हा उपक्रम अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास जैन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष भूषण भंडारी, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे दीपक पापडेजा, डॉ. सतीश आहिरे, अएसो चे खजिनदार प्रकाश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जॉयसचे मनीष बोरा, रोहित लुनिया, अमित शिंगवी, प्रीतम पोखरणा, आनंद कटारिया, संकेत गांधी, सचिन डागा, प्रोजेक्ट चेअरमन तेजस डागा यांच्यासह अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


प्रास्ताविकात भूषण भंडारी यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आजच्या काळात अवयवदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची खरी सेवा आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांचे जीवन वाचू शकते. मात्र समाजातील चुकीच्या समजुती, रुढी व परंपरांमुळे अनेक नागरिक पुढे येत नाहीत. या गैरसमजुती दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्‍यक असून, त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रोजेक्ट चेअरमन तेजस डागा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांच्या कुटुंबांमार्फत अवयवदानाचा संदेश मोठ्या प्रमाणात पोहोचवता येऊ शकतो. त्यामुळे या चळवळीला गती देण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहरात शिक्षकांमध्ये जागृती करून पुढील पिढीपर्यंत हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यकृतदान करणाऱ्या निकिता गांधी यांनी आपल्या अनुभवातून उपस्थितांना भावनिक संदेश दिला. त्या म्हणाल्या, “एखाद्याचे प्राण वाचवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. मृत्यूनंतर शरीर दफन किंवा दहन केले जाते, पण त्याच शरीरातील अवयवांनी अनेकांना नवे जीवन देता येते. अवयवांसाठी रुग्णांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.” त्यांनी अवयवदान चळवळ अधिक व्यापक करण्याची आवश्‍यकता व्यक्त करत सर्वांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गुगळे यांनी केले. संपूर्ण शिबिरात उपस्थित शिक्षकांना अवयवदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *