• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहापूर येथील त्या पेट्रोल पंप चालकाची डिलरशिप रद्द करण्याची मागणी

ByMirror

Apr 1, 2026
शहापूर येथील त्या पेट्रोल पंप चालकाची डिलरशिप रद्द करण्याची मागणी

बिल मागितल्यावरुन ग्राहकावर लोखंडी रॉडने हल्ला; भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे तक्रार केल्याने पंप बंद केल्याचा तक्रारदाराचा दावा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या आनंद पेट्रोल पंपावर डिझेलचे बिल मागितल्याच्या कारणावरून ग्राहक व त्याच्या मित्रावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात संबंधित सेल्समन व पंप कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार विशाल राजेंद्र बेरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे पंपावरील गैरप्रकारांची तक्रार केली असून, त्यानंतर संबंधित पेट्रोल पंप बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, या पंपाची डिलरशिप तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


विशाल बेरड हे पेव्हर ब्लॉक व जेसीबी मशीन व्यवसाय करतात आणि त्यांच्या मशिनसाठी ते नियमितपणे आनंद पेट्रोल पंपावरून डिझेल घेत असतात. दिनांक 29 मार्च रोजी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास ते आपल्या मित्र गणेश जरे यांच्यासोबत मोटारसायकलवरून संबंधित पंपावर गेले होते. त्यांनी सुमारे 3,500 रुपयांचे डिझेल प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून घेतले व त्याचे पैसेही अदा केले.


मात्र, व्यवहारानंतर त्यांनी बिलाची मागणी केली असता, तेथील सेल्समन प्रशांत बेरड याने बिल देण्यास नकार दिला. यावरून वाद निर्माण झाला आणि तक्रारदार आणि त्याच्या मित्राला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी प्रशांत गोरख बेरड, सागर मधुकर बेरड, निलेश गोरख बेरड आणि किरण संपत नाटक (सर्व रा. शहापूर, ता. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, तक्रारदाराने पंपावरील कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोपही केला असून त्यांचे वर्तन अत्यंत अश्‍लील, गैरव्यावसायिक आणि बेजबाबदार असल्याचे नमूद केले आहे. तसेच, पंप व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसणे, मोफत हवा व पाण्याची सुविधा उपलब्ध नसणे, कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत काम करणे, तसेच देखभाल व सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, पंप मालकाकडून कर्मचाऱ्यांचे संरक्षण केले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या सर्व पार्श्‍वभूमीवर आनंद पेट्रोल पंपाची डिलरशिप तात्काळ रद्द करून संबंधित मद्यधुंद कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *