अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी
बनावट ड्रग्स कारवाईची SITमार्फत चौकशी करा; दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा एका महिन्यात कारवाई न झाल्यास नाशिकमध्ये बेमुदत उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील संगमनेर एमडी ड्रग्स बनावट प्रकरण तसेच अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्यातील कथित गांजा बनावट कारवाईमध्ये दोषी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची केवळ बदली न करता त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांना केवळ बदलीची मलमपट्टी न करता ठोस कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी मांडली आहे.
यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात एक महिन्याच्या आत ठोस कारवाई झाली नाही, तर विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अरुण रोडे यांनी दिला आहे.
संगमनेर येथील एमडी ड्रग्स प्रकरणाबाबत समितीने निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी संगमनेर बसस्थानक येथे एका वाहनात पोलिसांच्या उपस्थितीत एका तृतीय व्यक्तीमार्फत एमडी ड्रग्सचा पाऊच ठेवण्यात आला. त्यापूर्वी त्याच वाहनाची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये काहीही आढळले नसल्याचा दावा समितीने केला आहे. त्यानंतर सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी संबंधित वाहन नेण्यात आले आणि तेथे ड्रग्स ठेवून पंचनामा करण्यात आला. या कारवाईत एका व्यक्तीवर नाहक गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे. या संगमनेर एमडी ड्रग्स प्रकरणासंदर्भात तक्रारी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपलब्ध वृत्तानुसार, या प्रकरणातील पोलिस उपनिरीक्षकांच्या भूमिकेबाबत तक्रारी झाल्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कथित गांजा कारवाईबाबतही समितीने गंभीर आरोप केले आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, शहरातील एका व्यक्तीच्या घरात खाकी वर्दीच्या पाठिंब्याने गांजाची पिशवी ठेवण्यात आली आणि त्यानंतर बनावट गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कारवाईतील कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे.
समितीने मात्र केवळ बदलीची कारवाई पुरेशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांना साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ बदलीची किरकोळ शिक्षा करण्यात आली असून, ही कारवाई अत्यंत अपुरी असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. समितीने निवेदनात म्हटले आहे की, NDPS Act चा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा तसेच खाकी वर्दीतील दलालामार्फत पैसे उकळण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारांमुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे समितीने म्हटले आहे.
संगमनेर एमडी ड्रग्स प्रकरण आणि अहिल्यानगर कोतवाली गांजा प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) किंवा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, कथित बनावट कारवाई करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि खाजगी दलाल यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम 228, 246 तसेच NDPS कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची केवळ बदली न करता त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. “एमडी ड्रग्स आणि गांजा बनावट कारवाईच्या आरोपांमध्ये केवळ बदली करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न न करता, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. एका महिन्यात कारवाई झाली नाही, तर नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल,” असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.

