राज्यातील सर्वोच्च क्लब स्पर्धेत जिल्ह्याचा पहिल्यांदा सहभाग
विजेत्या संघाला आय-लीग 3 मध्ये पदोन्नतीची सुवर्णसंधी; 7 मार्चला लोणावळ्यात मुंबई फुटबॉल क्लबविरुद्ध पहिली लढत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच उत्कृष्ट कामगिरी करत फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लबने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन वरिष्ठ पुरुष क्लब लीग अजिंक्यपद स्पर्धा 2026 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. अहिल्यानगरमधील एखाद्या क्लबला प्रथमच या राज्यस्तरीय सर्वोच्च व्यावसायिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
ही तीन टप्प्यांत पार पडणारी स्पर्धा 7 मार्च 2026 पासून लोणावळा (जि. पुणे) येथे सुरू होणार आहे. फिरोदिया शिवाजियन्सचा संघ 6 मार्च रोजी लोणावळ्याकडे रवाना होणार असून, जिल्ह्याच्या फुटबॉल इतिहासातील हा अत्यंत अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. कारण विजेत्या संघाला राष्ट्रीय स्तरावरील आय-लीग 3 मध्ये पदोन्नतीची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वोत्तम संघांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची संधीही क्लबसमोर आहे. अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यातून आलेल्या संघासाठी ही स्पर्धा म्हणजे केवळ सहभाग नव्हे, तर व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात मोठी झेप घेण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
क्लबच्या या ऐतिहासिक यशामागे प्रशिक्षक मंडळाची सातत्यपूर्ण मेहनत आहे. प्रशिक्षक मंडळात जेव्हिअर स्वामी, सचिन पठारे, राजेश अँथनी, पल्लवी सैंदाणे, श्रेया सागडे आणि अभिषेक सोनवणे यांचा समावेश असून त्यांनी संघाची काटेकोर तयारी करून घेतली आहे.
संघात मयूर गोरखा, रोशन रिकामे, प्रदीप सिंह, शुभम राऊत, अभिजीत निकोल्सन, रौनक जाधव, अभय साळवे, अरमान फकीर, सार्थक भोसले, शाह नवाज, अतुल डे, हिमांशू थोरात, सलमान शेख, सुयोग महागडे, उत्कर्ष सोनवणे, ऋषभ मणी, साहिल कुसाळकर, जोएल पठारे, नील धेंडवाल, शुभम शिवानंद, ओईनाम महेश, इम्रान शेख, अनोश कामाठी, इमॅन्युएल पिल्ले आणि दर्शन पवार या खेळाडूंचा समावेश आहे.
संघाचे फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. आश्री बगदादी कार्यरत असून खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष भर दिला जात आहे. फिरोदिया शिवाजियन्सचा पहिला सामना 7 मार्च रोजी बलाढ्य मुंबई फुटबॉल क्लब विरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अनुभवी आणि मजबूत संघाविरुद्ध खेळताना फिरोदिया शिवाजियन्सची खरी कसोटी लागणार आहे.
या यशात अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे क्लबने नमूद केले आहे. तसेच सराव व तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालय या स्थळ भागीदाराचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
क्लबचे सहमालक नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांनी सांगितले की, “फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब हा क्लबचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अहिल्यानगरचे राज्य पातळीवर अभिमानाने प्रतिनिधित्व करण्यासाठी कटिबद्ध आहे.” राज्याच्या सर्वोच्च स्तरावर सहभाग नोंदवत फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लबने अहिल्यानगरच्या क्रीडा विश्वात आपली छाप सोडली आहे.
