• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

पैलवान प्रियज करपेला थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

ByMirror

Mar 1, 2026
पैलवान करपेने हलाखीच्या परिस्थितीतून मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी -ॲड. सदावर्ते

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते सन्मान; खेळाडूला 1 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा


पैलवान करपेने हलाखीच्या परिस्थितीतून मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी -ॲड. सदावर्ते

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मेहेकरी (ता. नगर) येथील कुस्तीपटू पैलवान प्रियज संतोष करपे याने थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले. या उल्लेखनीय यशाबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पैलवान करपे याचा सत्कार केला. यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या सत्कार समारंभात प्रियज करपे याच्या जिद्दीचा, परिश्रमांचा आणि चिकाटीचा गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीतून स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. पैलवान करपे हा मेहेकरी येथील क्रीडा लक्ष्य तालिममध्ये वस्ताद तात्या करपे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे.


ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, प्रियज करपे याने परिस्थितीवर मात करुन कुस्ती क्षेत्रात केलेली कामगिरी प्रेरणादायी आहे. हलाखीच्या परिस्थितीतूनही जिद्द, सातत्य आणि प्रामाणिक मेहनत यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचता येते, हे प्रियजने सिद्ध करून दाखवले आहे. आजच्या युवकांनी मोबाईल आणि आभासी दुनियेपासून दूर राहून क्रीडा, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे.


ते पुढे म्हणाले, “खेळाडूंना योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले, तर त्यांची उर्जा दुणावते. समाजातील सक्षम घटकांनी अशा खेळाडूंना आर्थिक व नैतिक आधार देणे ही आपली जबाबदारी आहे. प्रियजसारख्या तरुणांच्या पाठीशी उभे राहणे आवश्‍यक आहे. या यशाचा गौरव करत ॲड. सदावर्ते यांनी त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर आश्‍वासन दिले.


प्रियज करपे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, माझ्या कुटुंबियांचे, प्रशिक्षकांचे आणि मला साथ देणाऱ्या सर्वांचे हे यश आहे. देशासाठी सुवर्णपदक मिळवण्याचा माझा पुढील संकल्प असल्याचे स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *