• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विनाअनुदान तत्त्वावर वापरण्यास देण्याची आंबेडकरी समाजाची मागणी

ByMirror

Sep 22, 2026
‘स्मारकाची देखभाल आम्ही करतो; तथागत बुद्धिष्ट सोसायटी संस्थेला वापरासाठी जागा द्या’

आयुक्त यशवंत डांगे यांना शिष्टमंडळाचे निवेदन; धम्म प्रशिक्षणासह शालेय शिक्षण घेणाऱ्या बालभन्तेंच्या वास्तव्यासाठीही जागेची मागणी


‘स्मारकाची देखभाल आम्ही करतो; तथागत बुद्धिष्ट सोसायटी संस्थेला वापरासाठी जागा द्या’


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील टिळक रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा तथागत बुद्धिष्ट सोसायटी, भारत या संस्थेला विनाअनुदान तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावी, अशी मागणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. 21 सप्टेंबर) आंबेडकरी समाजाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या स्मारकाच्या ठिकाणी बौद्ध धर्माचे बालभन्ते तसेच भन्ते (धर्मगुरू) वास्तव्यास असून धम्माचे प्रशिक्षण, प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले जात असल्याचे शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे. यावेळी भन्ते धम्मपाल, संजय कांबळे, सागर चाबुकस्वार, रोहित आव्हाड, सुनील शिंदे, संजय जगताप, सुहास धीवर, अमर निरभवणे, बंटी साळवे, सिध्दांत कांबळे, दिलीप साळवे, विशाल भिंगारदिवे, सुनील सूर्यवंशी, विजय शिरसाठ, बबन दिवे, शाहबाज शेख, मुशर्रफ खान, शेखर पंचमुख, जयराम आंग्रे, स्वप्नील साठे, गुलाम शेख आदी उपस्थित होते.


बालभन्ते येथे धम्म प्रशिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण घेत असून, महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून भन्तेही या स्मारकाला भेट देऊन धम्माचा प्रचार व प्रसार करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही समाजाच्या हितासाठी उभारण्यात आलेली वास्तू असून, तिचा उपयोग सामाजिक व धम्मविषयक उपक्रमांसाठी व्हावा, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. समाजाच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजाला धम्मरथ तसेच शववाहिनी मोफत उपलब्ध करून दिली जाते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


तथागत बुद्धिष्ट सोसायटीकडून सन 2022 पासून या स्मारकाची देखभाल चांगल्या पद्धतीने करण्यात येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. समाजातील नागरिकांसाठी श्रामणेर शिबिर, धम्म परिषद तसेच वधू-वर सूचक मंडळाचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रविवारी वधू-वर सूचक मंडळाचा उपक्रम मोफत घेतला जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


या वास्तूची पूर्वी योग्य प्रकारे देखभाल झाली नसल्याने ती जीर्ण अवस्थेत गेली होती. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून वास्तूची देखभाल करण्यास सुरुवात करण्यात आली असून, तिचे नूतनीकरण तसेच संस्थेकडे हस्तांतरण करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी महापालिकेकडून आलेल्या पत्राच्या पार्श्‍वभूमीवर शिष्टमंडळाने आपली भूमिका प्रशासनासमोर मांडली. यापूर्वी संस्थेने केलेल्या मागण्यांबाबत महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित पत्रव्यवहार किंवा उत्तर मिळाले नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेने इतर समाजांना ज्या पद्धतीने सामाजिक उपयोगासाठी ओपन स्पेस उपलब्ध करून दिली आहे, त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संस्थेला विनाअनुदान तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावे. धम्माचा प्रचार व प्रसार, बालभन्तेंचे शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू राहण्यासाठी ही जागा संस्थेला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


–—
‘संविधान भवन उभारा; आम्ही एका दिवसात जागा खाली करू!’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेवर संविधान भवन उभारण्याचा महापालिकेचा निर्णय असेल आणि त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असेल, तर त्यास आमचा विरोध नाही. संविधान भवन व्हावे, ही आमचीदेखील इच्छा आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी संविधान भवनाच्या कामाची वर्क ऑर्डर, टी.पी. प्लॅन तसेच निधी मंजुरीची कागदपत्रे समाजासमोर सादर करावीत. ही कागदपत्रे दाखविल्यानंतर भन्ते स्वतःहून एका दिवसात सदर जागा मोकळी करून देतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्वी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्या ठिकाणी सुरू असलेले गैरप्रकार बंद करून वास्तूची स्वच्छता व देखभाल करण्यात आली. त्यामुळे सध्या ही वास्तू समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरली जात आहे. नुकतीच येथे धम्म परिषदही पार पडली. समाजासाठी उपयुक्त असलेल्या या वास्तूचा वापर सुरू असताना महापालिकेने संविधान भवन उभारणीची प्रक्रिया प्रत्यक्षात कोणत्या टप्प्यावर आहे, हे स्पष्ट करावे. -भन्ते धम्मपाल

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *