आंतरराष्ट्रीय पंच गौरव सिंह यांचे तंत्रशुद्ध खेळ व नियमावलीबाबत केले मार्गदर्शन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदोच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनच्या अंतर्गत तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, अहिल्यानगर व एकलव्य तायक्वांदो अकॅडमी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंच परीक्षा उत्साहात पार पडली. झेंडा चौक, भूषण नगर, केडगाव येथील आर.एम.टी. बिझनेस सेंटरमध्ये नुकतीच ही परीक्षा घेण्यात आली.
या पंच परीक्षेसाठी परीक्षक म्हणून उत्तराखंडचे आंतरराष्ट्रीय पंच गौरव सिंह उपस्थित होते. त्यांनी सहभागी पंचांना तायक्वांदो खेळातील विविध तंत्रे, सामन्यांचे नियम, पंचांची भूमिका, निर्णयप्रक्रिया तसेच तंत्रशुद्ध पद्धतीने खेळाचे संचालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम व पंचगिरीतील बारकावे समजून घेण्यासाठी ही परीक्षा व मार्गदर्शन कार्यशाळा उपयुक्त ठरली.
यावेळी महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष घनश्याम सानप, क्रीडा राज्य मार्गदर्शक संतोष वाबळे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अल्ताफ खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंच परीक्षेतील सहभागींचा उत्साह वाढला. या पंच परीक्षेत गणेश वंजारे, योगेश बिचितकर, युवराज लोखंडे, मंगेश आहेर, तेजअंकित बोंगाडे, वैष्णवी पाटोळे, ओमकार पवार, पियुष सहानी, अमित लोंढे, सचिन कोतकर, चंद्रकांत बिरारे, असता तोमर आणि सबा खान यांनी सहभाग नोंदविला.
तायक्वांदो हा शिस्त, अचूकता आणि नियमबद्धतेवर आधारित खेळ असून, पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे पंचांना अद्ययावत नियमांची माहिती असणे तसेच सामन्यादरम्यान योग्य व निष्पक्ष निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे यावेळी गौरव सिंह यांनी सांगितले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण, कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, अहिल्यानगर शहर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपाध्यक्ष संतोष लांडे तसेच आर.एम.टी. बिझनेस सेंटरचे चेअरमन मनीष ठुबे यांनी पंच परीक्षा व मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

