• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली ज्ञानाची रयत

ByMirror

Sep 22, 2026
कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली ज्ञानाची रयत

‘कमवा आणि शिका’च्या विचारांपासून AI च्या युगापर्यंत; रयत शिक्षणाचा आधुनिक प्रवास


शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुली करणाऱ्या कर्मवीरांच्या विचारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण नियोजनाची जोड
22 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एका महान व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा दिवस. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती म्हणजे केवळ एका महान शिक्षणमहर्षीचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या कर्मयोग्याला अभिवादन करण्याचा दिवस आहे.


कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या काळात शिक्षणाची चळवळ उभी केली, त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आजच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी होती. ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि वंचित कुटुंबांतील मुलांना शिक्षण मिळणे हीच मोठी गोष्ट होती. अशा परिस्थितीत शिक्षण काही मोजक्या लोकांच्या हातात न राहता ते बहुजन समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, हा विचार कर्मवीरांनी कृतीत आणला. स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता त्यांनी शिक्षणाचा यज्ञ सुरू केला. हा यज्ञ उभारताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र ध्येय स्पष्ट होते.
“बहुजन समाजातील मुलांच्या हातात शिक्षणाचे सामर्थ्य द्यायचे.”


याच ध्येयातून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार होत गेला. कर्मवीरांनी लावलेले हे छोटेसे रोपटे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला विशाल वटवृक्ष झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत अनेक पिढ्यांनी शिक्षण घेतले, जीवन घडविले आणि समाजाच्या विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले. कर्मवीरांचे कार्य केवळ शाळा सुरू करण्यापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे, श्रमाची प्रतिष्ठा समजावी आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवावे, हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. “कमवा आणि शिका” ही संकल्पना त्याच व्यापक विचारातून आकाराला आली. आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा कर्मवीरांनी केलेल्या त्यागाची खरी उंची लक्षात येते. त्यांनी शिक्षणासाठी केवळ पैसा किंवा साधने उभी केली नाहीत; त्यांनी शिक्षणाविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलला. गरीब मुलाला शिक्षण मिळू शकते, ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि श्रमातून ज्ञानाकडे जाणारा मार्ग खुला होऊ शकतो, हा आत्मविश्‍वास त्यांनी समाजाला दिला. म्हणूनच आजच्या रयत शिक्षण संस्थेकडे पाहताना तिच्या भौतिक विस्ताराबरोबरच तिच्या विचारांचा प्रवासही समजून घेणे आवश्‍यक आहे.


कर्मवीरांच्या विचारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
आज काळ बदलला आहे. शिक्षणासमोरची आव्हानेही बदलली आहेत. पूर्वी शाळा उभारणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत आणणे हे मोठे आव्हान होते; आज विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील कौशल्ये, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि बदलत्या जगाशी स्पर्धा करण्याची क्षमता देणे ही काळाची गरज आहे. याच बदलत्या गरजेचा विचार करून रयत शिक्षण संस्था आधुनिक शिक्षणपद्धतीकडे वाटचाल करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली रयतच्या शैक्षणिक कार्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये Interactive Panel द्वारे अध्यापन सुरू झाले आहे. वर्गखोलीतील पारंपरिक फळ्याबरोबरच डिजिटल माध्यमातून विषय विद्यार्थ्यांसमोर अधिक दृक्-श्राव्य आणि अनुभवाधारित पद्धतीने मांडण्याची संधी शिक्षकांना मिळत आहे.याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना परिचित करून देण्याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेने केली आहे. AI, Coding, Machine Learning, Robotics, 3D Printing, IoT यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना भविष्यातील जगाशी जोडण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे.कर्मवीरांनी त्यांच्या काळात उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. आजच्या काळात उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तेच शिक्षण अधिक परिणामकारक करण्याची गरज आहे. त्यामुळे कर्मवीरांच्या विचारांचा आत्मा तोच आहे; फक्त शिक्षणाची साधने बदलली आहेत.
प्रत्येक शाखेसाठी ‘गुणवत्ता विकास आराखडा नियोजनातून गुणवत्तेकडे, रयत शिक्षण संस्थेच्या सध्याच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा’.


संस्थेच्या विविध शाखांचा शैक्षणिक विकास केवळ सर्वसाधारण उद्दिष्टांवर न थांबता, प्रत्येक शाखेची प्रत्यक्ष परिस्थिती, गरजा, उपलब्ध साधने, विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, गुणवत्ता वाढीची आवश्‍यकता आणि भविष्यातील उद्दिष्टे यांचा विचार करून शाखानिहाय गुणवत्ता विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया ही निश्‍चितच नियोजनबद्ध शैक्षणिक वाटचालीची दिशा दर्शविते. प्रत्येक शाळा वेगळी असते. तिचे विद्यार्थी वेगळे असतात, परिसर वेगळा असतो, पालकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि शाळेसमोरील आव्हानेही वेगळी असतात. त्यामुळे सर्व शाखांसाठी एकच चौकट न ठेवता “प्रत्येक शाखेचा विकास तिच्या गरजेनुसार” या दृष्टिकोनातून तयार होणारा गुणवत्ता विकास आराखडा महत्त्वाचा ठरतो. या आराखड्यामुळे शाळेने कुठे जायचे आहे, कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कोणता बदल घडवायचा आहे, शिक्षकांच्या अध्यापनात कोणत्या नव्या पद्धती आणायच्या आहेत, भौतिक सुविधांमध्ये कोणती सुधारणा करायची आहे आणि पुढील काळात शाळेची गुणवत्ता कोणत्या दिशेने नेयची आहे, याचे नियोजन अधिक स्पष्ट होऊ शकते. म्हणजेच, आजची रयत केवळ “शाळा चालविण्याचा” विचार करीत नाही; तर प्रत्येक शाखेचा नियोजनबद्ध शैक्षणिक विकास करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.ही बाब कर्मवीरांच्या विचारांशी जोडली तर तिचे महत्त्व आणखी अधोरेखित होते. कर्मवीरांनी शिक्षणाची चळवळ उभारताना परिस्थितीचे भान ठेवले. आज त्याच रयतने बदलत्या काळाचे भान ठेवून प्रत्येक शाखेच्या भविष्यासाठी नियोजन करण्याची भूमिका स्वीकारणे, हा त्यांच्या विचारांचा आधुनिक संदर्भ म्हणता येईल.


रयत म्हणजे केवळ इमारती नव्हेत; रयत म्हणजे विचारांची परंपरा
आज रयत शिक्षण संस्थेच्या असंख्य शाखांकडे पाहताना मोठ्या इमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, डिजिटल साधने किंवा आधुनिक सुविधा दिसतात. पण रयतची खरी ओळख या भौतिक सुविधांमध्ये नाही. रयतची खरी ओळख तिच्या विचारांमध्ये आहे. कर्मवीरांनी शिकविले की शिक्षण हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. आजच्या काळात त्याच विचाराचा अर्थ असा होतो की आधुनिक शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधीही समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील एखाद्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थी Interactive Panel वर शिकतो, Artificial Intelligence विषयी जाणून घेतो, Coding किंवा Robotics चा अनुभव घेतो आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करण्याचे स्वप्न पाहतो तेव्हा कर्मवीरांनी सुरू केलेल्या शिक्षणचळवळीचा आधुनिक विस्तार आपल्या डोळ्यांसमोर दिसतो.


आता जबाबदारी रयत सेवकांची
कर्मवीरांनी संस्था उभी केली; पुढील पिढ्यांनी तिचा विस्तार केला. आज संस्था आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. परंतु कोणतीही संस्था कितीही मोठी असली तरी तिचे यश शेवटी वर्गखोलीत ठरते. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोळ्यातील जिज्ञासा ओळखली, त्याला प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त केले, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, वाचन-लेखनाची सवय लावली आणि त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण केला, तरच खऱ्या अर्थाने गुणवत्ता निर्माण होईल. म्हणूनच प्रत्येक रयत सेवकाने स्वतःला एक प्रश्‍न विचारण्याची गरज आहे “कर्मवीरांनी आमच्यासाठी एवढा त्याग केला; त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण काय करीत आहोत?” या प्रश्‍नाचे उत्तर आपल्या दैनंदिन कामातून मिळाले पाहिजे. कर्मवीरांना खरी आदरांजली म्हणजे केवळ जयंती साजरी करणे नव्हे. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे, एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण करणे, शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आणि आपल्या शाखेला नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेणे हीच त्यांच्या विचारांना खरी मानवंदना आहे.


ज्ञानाची ही ज्योत पुढे नेऊया…
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जवळपास शतकापूर्वी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज महाराष्ट्राच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश देत आहे. त्या ज्योतीत आता आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडत आहे. Interactive Panel पासून Artificial Intelligence पर्यंत, पारंपरिक अध्यापनापासून डिजिटल शिक्षणापर्यंत आणि केवळ शाळा चालविण्यापासून शाखानिहाय शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्यापर्यंत रयतचा प्रवास पुढे जात आहे. हा प्रवास केवळ तंत्रज्ञानाचा नाही; हा कर्मवीरांच्या विचारांना काळानुरूप नवे रूप देण्याचा प्रवास आहे. कर्मवीरांनी बहुजनांच्या हातात शिक्षणाची मशाल दिली. आज त्या मशालीचा प्रकाश आणखी दूरवर पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे.


कर्मवीरांचे कार्य इतिहासात आहे; त्यांचे विचार वर्तमानात आहेत; आणि त्या विचारांची दिशा आपल्या भविष्यात आहे. 22 सप्टेंबरच्या कर्मवीर जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आपण एक संकल्प करूया रयतच्या प्रत्येक शाखेतून गुणवत्तापूर्ण, आधुनिक, मूल्याधिष्ठित आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रकाश अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया. हीच कर्मवीरांच्या त्यागाला खरी आदरांजली!

  • शिवाजीराव लंके
    (मुख्याध्यापक) कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, कोपरगाव

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *