निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल -पोलीस निरीक्षक संपत शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण करणारे पोलीस व सामाजिक योगदान देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केडगावला वृक्षरोपण अभियान राबविले. निवारा सामाजिक सेवाभावी संस्था व कोतवाली पोलीस स्टेशनच्या वतीने एकनाथनगर येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात वृक्षरोपण अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस व नागरिकांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन भारत माता की जय… वंदे मातरम… च्या घोषणांनी परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी विविध प्रकारचे झाडे लावली. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कोतवाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या हस्ते वृक्षरोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सेवाभावी संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर नलिनी गायकवाड, व्हाईस चेअरमन सोमनाथ जंगमदेवा, अध्यक्षा स्नेहल लोहकरे, कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनचे अॅड. राजेश कावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, रोहित गायकवाड, विशाल कळमकर, निलेश कळमकर, रावसाहेब कांबळे, पोलीस नाईक संतोष घोमसाळे, योगेश खामकर, बाळू खामकर, बंडू भागवत, सलिम शेख, सुनिल भिंगारदिवे, सुधाकर तागड, राहुल शेळके, तानाजी पवार, अशोक कांबळे, अतुल कांबळे आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले की, निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल. अन्यथा मनुष्याला संकटांपासून कोणीही वाचवू शकत नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी वृक्षरोपण व संवर्धनाच्या चळवळीत योगदान दिल्यास देश सुजलाम-सुफलाम होणार आहे. तर पर्यावरणाचे प्रश्न देखील सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नलिनी गायकवाड म्हणाल्या की, मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. वृक्ष निसर्गाचा महत्त्वाचा घटक असून, पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतुचक्र वृक्षांमुळे संतुलित राहते. निसर्गाने मानवाला निस्वार्थीपणे सर्वकाही दिले. मात्र मनुष्याने हव्यासापोटी निसर्गाकडून ओरबडून घेतले. वृक्षांची झालेल्या बेसुमार कत्तलीमुळे निसर्गाचे समतोल बिघडले असून, त्याच्या रक्षणासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहल लोहकरे यांनी समाज रक्षणाचे कार्य करणारे पोलीसांनी पर्यावरण रक्षणासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
