• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलनात पै. नाना डोंगरे यांना प्रमुख पाहुण्याचा मान

ByMirror

May 19, 2026
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार

ग्रामीण साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्य, समाजकारण आणि जनजागृतीच्या चळवळीला सातत्याने बळ देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना चौफुला केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे आयोजित राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.


दि. 23 व 24 मे रोजी दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी दिली.


या संमेलनातील कवी संमेलनाच्या विशेष सत्रात पै. नाना डोंगरे यांना ‘मान्यवर पाहुणे’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. साहित्य चळवळीला चालना देण्याबरोबरच ग्रामीण भागात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.


पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनजागृती झाली आहे.
स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण अभियान, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, गावपातळीवर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही सातत्याने सुरू आहे.


महिला बचत गट मेळावे, युवा संमेलने, विविध सामाजिक स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी आतापर्यंत आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने आणि सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. या उपक्रमांमुळे अनेक नवोदित कवी, लेखक आणि साहित्यिकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या बहुआयामी आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *