रांजणगावच्या गणपती मंदिरात सार्वजनिक स्वच्छतेची शपथ
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम तुळापूर येथे राबविण्यात आला. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांनी प्रथम महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर समाधी परिसर, परिसरातील सार्वजनिक जागा तसेच परिसरातील स्वच्छतेचे काम हाती घेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे इतिहासाचे जतन, स्वच्छतेचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी पटवून देण्यात आली.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, अशोक भालके, संदीप डोंगरे, ऋषीकेश चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित युवकांनी ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश देत परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच रांजणगाव (जि. पुणे) येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात दर्शन घेण्यात आले. मंदिर परिसरातही स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची शपथ देण्यात आली. संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे सामाजिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले जात असून भविष्यातही समाजप्रबोधनासाठी विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन करून थांबणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारातून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. समाधीस्थळी स्वच्छता अभियान राबवून इतिहासाबद्दलचा आदर आणि समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी व्यक्त करत आहोत. सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि गाव परिसर स्वच्छ ठेवणे ही खरी देशसेवा आहे. युवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
