पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) च्या वतीने श्रीकृष्ण जन्मसोहळा उत्साहात साजरा
भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या शोभायात्रेत उंट, घोडे व बग्गीतील राधा-कृष्णच्या वेशभुषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. शोभायात्रेतील राधा-कृष्णची मुर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरली. युवक-युवतींच्या ढोल पथकाने शोभायात्रेत चैतन्य निर्माण केले.
फुलांनी सजवलेल्या मुख्य रथात भगवान श्रीकृष्णाची उत्सव मुर्ती विराजमान होती. भक्तीमय व उत्साहपुर्ण वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत शीख, पंजाबी, सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर महिलांणी भगवे फेटे बांधून शोभायात्रेत सहभाग नोंदवला.
पंजाबी समाजाचे ज्येष्ठ नागरिक नंदकिशोर खत्री व महेंद्र सबलोक यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णची आरतीने शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, संजय धुप्पड, प्रदिप पंजाबी, पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी, विरेंद्र ओबेरॉय, विजय पंजाबी, सुनिल सहानी, अमरीश सहानी, किशोर कंत्रोड, प्रितपाल धुप्पड, किशोर जग्गी, सुनिल सहानी, जीएनडी ग्रुपचे संजय आहुजा, अनिल शर्मा आदींसह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
शोभायात्रेत भक्ती गीतांवर युवकांनी ठेका धरला होता. भक्तीमय वातावरणात निघालेल्या शोभायात्रेचे चौका-चौकात स्वागत करुन भाविकांनी श्रीकृष्ण उत्सव मुर्तीचे दर्शन घेतले. जी.एन.डी ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात आला होता. सर्जेपुरा मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ होऊन कापडबाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, तेलीखुंट मार्गे मंदिरा जवळ शोभायात्रेची सांगता झाली.
मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंदिराला आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच मध्यरात्री मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला.